Angry farmers in Akola returned money to the government : अकोल्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सरकारला केले पैसे परत
Akola : निसर्गाच्या कोपानं आधीच उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता सुलतानी ताप ओढवला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 3, 5, 8 आणि 21 रुपयांची नुकसानभरपाई जमा झाल्याने एकच संताप उसळला आहे. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असतानाच, या तुटपुंज्या मदतीमुळे शासनाने शेतकऱ्यांची थट्टाच केल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अकोल्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या फटक्यात सापडले आहेत. उभे पीक वाहून गेले, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीसुद्धा खरडून गेली. त्यात केवायसी व प्रशासकीय प्रक्रियेच्या विलंबामुळे शासनाची मदत वेळेवर मिळाली नाही. दिवाळीसारख्या सणात घराघरात अंधार पसरला. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेतून 3, 5, 8 रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याचे एसएमएस पाहून शेतकऱ्यांचा संताप फुटला.
Teachers’ Constituency Election : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्वतयारी
शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “सरकारला शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल, पण अशा स्वरूपात अपमान करू नये. ही मदत नव्हे, तर जखमेवर मीठ चोळण्यासारखी गोष्ट आहे.” शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत विचारलं, “या कंपन्या कोणत्या निकषावर नुकसानभरपाई ठरवतात? आणि शासनाला या कंपन्यांवर जरब आहे की नाही?”
दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक निषेध म्हणून ही नुकसानभरपाई शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला. वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी खात्यात जमा झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश आणि रोख स्वरूपात परत केली. “आम्ही भीक मागत नाही, न्याय मागतोय,” असं म्हणत शेतकऱ्यांनी शासनाचा जाहीर निषेध नोंदवला.
शेतकरी नेते कपिल ढोके, आदित्य मुरकुटे आणि केशव केंद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन शासनाने या थट्टेला आळा घालावा, पीक विमा कंपन्यांच्या निकषांचा पुनर्विचार करावा आणि शेतकऱ्यांना सन्मानजनक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पीक विम्यापोटी फक्त ५ रुपये; संतप्त शेतकऱ्यांनी रक्कम केली परत!
“पाच रुपयांत काय विकत घेणार? चहा तरी मिळेल का?” असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी सांगितले की, “आम्ही भरलेला विमा, गेलेलं पीक आणि झालेलं नुकसान याच्या तुलनेत ही रक्कम म्हणजे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्यासारखं आहे.”








