Exploitation, not education: Not a temple of education, but a market of counterfeiting : ६७२ बोगस शिक्षक, कोट्यवधींचा अपहार अन् ढिम्म असलेली यंत्रणा
Nagpur : वर्षानुवर्षे चालत आलेला महाघोटाळा, बनावट आयडी, खोटे दस्तावेज अन् तब्बल ६७२ बोगस शिक्षक.. राज्यातील शालेय शिक्षण विभाग आज शिक्षणाचे मंदिर राहिलेले नाही, तर बनावटगिरीचा बाजार बनला असल्याचं शालार्थ आयडी घोटाळ्यानं स्पष्ट केलं आहे. येवढा मोठा घोटाळा होऊनही शेकडो शिक्षकांमधून केवळ एक्कट-दुक्कटच शिक्षक चौकशीसाठी आले, हे ऐकून कुणाच्याही अंगावर शहारे येतील.
शिक्षण म्हणजे समाजाचं, देशाचं भविष्य घडवणं. पण येथे भविष्य नाही, तर फसवणूक घडवली गेली आहे. सायबर पोलिसांनी कोट्यवधींच्या वेतन फसवणुकीचे पुरावे हाती घेतले आहेत. आता पोलिस न्यायालयात वसुली करण्याची मागणी करणार आहेत. पण येथे मोठा प्रश्र्न असा आही की, ही वसुली फक्त शिक्षकांकडूनच होणार की या बनावट आयडींना वैध ठरवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खिशातूनही होईल ?
राज्याच्या शिक्षण यंत्रणेतील सडकेपणा इतका वाढला आहे की, ज्यांच्या हातात शिक्षणाची यंत्रणा आहे, त्यांच्याच हातूनच लूट सुरू आहे. कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार येथे होतो आहे. शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापक सगळ्यांवरच गुन्हे दाखल झालेले आहेत. पण चौकशीसाठी बोलावल्यावर केवळ एक्कट-दुक्कट शिक्षकच समोर येतात. हा प्रकार म्हणजे मोठे मासे अजूनही पाण्यातच आहेत, असेच म्हणता येईल.
Winter session : हिवाळी अधिवेशन आणि विदर्भ : हुरडा पार्ट्या, पर्यंटनाच्या प्रतिमेतून गांभीर्याकडे !
या प्रकरणाने शिक्षण विभाग आणि एकुणच सरकारचा चेहरा दाखवला आहे. डिजिटल इंडिया म्हणत आपण फिरतो पण आतमध्ये डिजिटल फसवणूक चालली आहे. कोणीतरी डेटा हेरून शिक्षक बनतो आणि खरे शिक्षक फायलींमध्ये अडकतात, हे शिक्षणाचं दुर्दैवी वास्तव आहे. शिक्षक बनवणारी व्यवस्था आता शिकवली गेली पाहिजे. राज्य सरकारने जर या घोटाळ्यातील बनावट ब्रिगेडला कठोर शिक्षा दिली नाही, तर भविष्यातील प्रत्येक शाळा ही घोटाळ्यांचाच शिकवणी वर्ग बनेल आणि विद्यार्थ्यांना नैतिकतेऐवजी नेटवर्कींग फसवणुकीचेच धडे मिळतील. हे सर्व प्रकार पाहून ‘शिक्षणाच्या आयचा घो…’, आठवला नाही, तर नवलच..!








