Vanchit Aghadi to to hold talks with like-minded parties : युती होणार नाही, याचा विचार करून तयारीला लागण्याच्या सूचना
Buldhana आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने बुलढाणा येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठकीत राजकीय रणशिंग फुंकले. “समविचारी पक्षांसोबत सन्मानपूर्वक युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा,” असे स्पष्ट आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी केले.
बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या जिल्हा संयुक्त कार्यकर्ता बैठकीत जाधव बोलत होते. या बैठकीचे आयोजन राष्ट्रीय सदस्य व जिल्हा निरीक्षक सविता मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
बैठकीदरम्यान नीलेश जाधव यांनी तालुका व शहर पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “युतीचा निर्णय हा सन्मानाच्या तत्त्वावरच व्हावा. भाजपा व त्यांच्या सहयोगी पक्षांपासून आमचा संघर्ष विचारसरणीचा आहे. त्यामुळे अशा पक्षांसोबत युतीचा प्रश्नच नाही. मात्र, समविचारी घटक पक्षांसोबत सन्मानपूर्वक चर्चा होईल, तर राज्य कार्यकारिणीला त्याबाबत निर्णय घेता येईल.”
Local Body Elections : निवडणूक जाहीर झाली, पोलीस दलात मोठे बदल!
जाधव पुढे म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु, जर सन्मानपूर्वक युती झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे सर्व जागांवर उमेदवार उभे करेल.”
या बैठकीत देवा हिवराळे (जिल्हाध्यक्ष उत्तर), शरद वसतकार, राजा भोजने, प्रविण पाटील, प्रशांत वाघोदे, सम्यक जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर, महिला आघाडीच्या विशाखा सावंग यांच्यासह विविध पदाधिकारी व नेते उपस्थित होते.








