Negative campaigning in legislative election : विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याचा ठपका
भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. अकोला पश्चिम Akola West विधानसभा मतदारसंघानंतर आता अकोट Akot विधानसभा मतदारसंघातील 11 दगाबाज पदाधिकाऱ्यांना पक्षातून सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आले आहे. विरोधात काम करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आधीच सांगितले होते. आता सत्ता स्थापन झाल्यानंतर पक्ष एक्शन मोडवर आला आहे.
अकोला जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व पाचही मतदारसंघात वर्चस्व मिळवणाऱ्या भाजपला 2024 च्या निवडणुकीत दोन जागांवर अपयश आले. अकोला पश्चिममध्ये पक्षाचा पराभव धक्कादायक ठरला. तर बाळापूरमध्ये देखील अपयश आले. याशिवाय जिल्हाभरात इतरही मतदारसंघात भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी कारवाई केली असल्याचा संशय होता. ते शोधून काढण्यासाठी भाजपने चौकशी समितीही गठीत केली होती.
या समितीने दिलेल्या अहवालावरून आता कारवाईचा बडगा उभारला जात आहे. महिनाभरापूर्वीच अकोला पश्चिम मतदारसंघातील सहा पदाधिकाऱ्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता अकोट मतदारसंघातील अकोट आणि तेल्हारा Telhara या दोन तालुक्यातून काही पदाधिकाऱ्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आला असल्याचा आदेश जिल्हाध्यक्ष किशोर मानके पाटील यांनी दिला आहे.
या पदाधिकाऱ्यांवर पक्षी विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रकाश भारसाकळे हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. पण तरीही त्यांच्या मताधिक्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पक्षाने विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.त्यांनाही सोडले नाही!
भारतीय जनता पक्षाने केलेल्या कारवाईत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आडतक, पंचायत समिती सदस्य राजेश येऊल, अकोट नगर परिषदेचे माजी सदस्य मंगेश चिखले यांच्या सह राजेंद्र पुंडकर, विशाल गणगणे, अरविंद लांडे, विशाल पाचडे, विष्णू बोडखे, सुनील गिरी, निलेश तिवारी, अकोला ग्रामीण युवती जिल्हाप्रमुख चंचल पितांबरवाले आदी पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.