Double Action Taken Against Police Inspector Nilesh Kare : पोलिस निरीक्षक नीलेश करे यांच्यावर दुहेरी कारवाई
Amravati गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि क्रीडा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अमरावती दौऱ्याच्या बंदोबस्ताला दांडी मारणाऱ्या पोलिस निरीक्षक नीलेश करे यांच्यावर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन स्वतंत्र आदेशांद्वारे करे यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी रोखण्यात आल्या असून, या कारवाईची चर्चा पोलिस विभागात सुरू आहे.
त्या वेळी करे हे फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते. सध्या ते विशेष शाखेत पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी पोलिस आयुक्तांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केले.
१७ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी सरनाईट पेट्रोलिंग तपासणी केली. त्यावेळी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार नीलेश करे हे डिव्हिजन पेट्रोलिंग गस्त ड्युटीवर अनुपस्थित असल्याचे आढळले. त्यांच्या गैरहजेरीची नोंद डीसीपींनी स्टेशन डायरीत केली. विशेष म्हणजे, करे यांनी वरिष्ठ अधिकारी किंवा नियंत्रण कक्षाला याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. या कसुरीबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती — “आपली पुढील वार्षिक वेतनवाढ एक वर्षाकरिता का रोखण्यात येऊ नये?” अशी विचारणा त्या नोटीसमध्ये करण्यात आली.
Bacchu Kadu Pravin Tayde : लाखाचे बक्षीस आणि कडू-तायडे आमनेसामने!
करे यांनी सादर केलेले स्पष्टीकरण असमाधानकारक ठरले. त्यामुळे कारणे दाखवा नोटीसमध्ये प्रस्तावित शिक्षा कायम ठेवत, एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला.
१० एप्रिल रोजी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यासाठी करे यांची ड्युटी शासकीय विश्रामभवनात लावण्यात आली होती. मात्र, बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर राहणे अनिवार्य असतानादेखील करे अनुपस्थित राहिले.
Teacher’s constituency : शिक्षक मतदारसंघातील मतदारसंख्या घटली
त्यानंतर ११ एप्रिल रोजी क्रीडा आणि कल्याण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा होता. त्या दिवशी देखील करे हे बंदोबस्त ड्युटीवर जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचे आढळले. दोन्ही दौऱ्यांदरम्यान त्यांनी कोणतीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नव्हती. या प्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून दुसरी वेतनवाढही रोखण्यात आली आहे.








