Criticism Over Anjali Damania Being a “Contract-Based” Social Activist : अमोल मिटकरी यांची टीका; जमीन खरेदी प्रकरणात केले होते भाष्य
Akola पुण्यातील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजली दमानिया यांच्यावर जोरदार शब्दांत पलटवार केला आहे.
मिटकरी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये दमानिया यांना उद्देशून टोलेबाजी करत म्हटले आहे, “जरा ‘दमा’न! मालकाकडून जास्त पगार मिळावा म्हणून मागील अनेक महिन्यांपासून अजितदादा आणि पार्थ पवारांवर खूप अभ्यास करावा लागला. इतकाच अभ्यास UPSC साठी केला असता, तर आज ही बिनबुडाचे आरोप करणारी ‘सुपारीबाज समाजसेवा’ तुमच्याकडून घडली नसती.”
Girl for marriage : मला पत्नी मिळवून द्या… तुमचे उपकार विसरणार नाही
पुढे त्यांनी उपरोधिक भाषेत लिहिले, “गोळ्या वेळेवर घेत चला, मेंदूची काळजी घ्या,” अशी बोचरी टीका करत दमानिया यांचा खरपूस समाचार घेतला.
दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या पुण्यातील महार वतनाच्या जमिनीबाबत गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्या असून पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच, “पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार पदावर राहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही,” असा सवाल उपस्थित करत त्यांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली.
दमानिया यांनी चौकशी समितीवरही शंका व्यक्त केली. “या समितीतील सहा पैकी पाच सदस्य पुण्यातीलच आहेत. अशा परिस्थितीत चौकशी निःपक्ष होईल का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित या जमीन व्यवहाराने राज्यात मोठं राजकीय वादळ निर्माण केलं आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने अंदाजे 1,800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे शासनाला सुमारे 152 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, व्यवहाराच्या नोंदणीवेळी केवळ 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेले.
Satyendra Bhusari : धावत्या रेल्वेतून पडून काँग्रेस नेते डॉ. भुसारी यांचे निधन
या प्रकरणात अनियमितता आढळल्याने सरकारने कारवाईचा बडगा उगारला असून तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी तक्रारीवरून तीघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पार्थ पवार यांच्या नावावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, यावरूनच दमानिया यांनी सरकार आणि चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.








