Six people from same family are nominated for the municipal council : नगरपरिषदेत एकाच कुटुंबातील सहा-सहा जणांना उमेदवारी !
Mumbai: महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पुन्हा ठळकपणे समोर आले आहे. राजकारणात ‘सामान्य कार्यकर्त्यां’चे स्थान नेमके काय राहिले आहे, हा प्रश्न पुन्हा अधोरेखित करणारी उदाहरणे कुळगांव-बदलापूर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेमध्ये पाहायला मिळत आहेत.
बदलापूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तर घराणेशाहीचा कळस गाठत एकाच घरातील तब्बल सहा जणांना उमेदवारी देऊन तिकीटवाटपात ‘फॅमिली पॅक’ मॉडेलच राबवले आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या गांधी कुटुंबावर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपनेही या स्पर्धेत मागे न राहता नांदेडमधील लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी देत राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे.
Devendra Fadnavis : निवडणुकीपूर्वीच भाजपचा मोठा डाव, राज्यात ‘भाकरी फिरणार’!
कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेतील तिकीटवाटपाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. शिंदे गटाचे बदलापूर शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा जणांना शिवसेनेने उमेदवारी दिली असून या यादीत वामन म्हात्रे स्वतः, त्यांची पत्नी, भाऊ तुकाराम म्हात्रे, भावजय उषा म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांचा समावेश आहे. 2015 मध्येही म्हात्रे परिवारातील चार जणांना तिकीट मिळाले होते, मात्र यंदा ही संख्या वाढून सहावर पोहोचली आहे. या घडामोडींनंतर बदलापूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली असून “सामान्य कार्यकर्त्यांच्या नावे फक्त सतरंज्या उचलण्याचे काम उरले आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणावर एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेचा अधिकृत प्रतिसाद काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Dharmendra passed away : हिंदी सिनेमाचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन
दरम्यान, काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करत आलेल्या भाजपकडूनही यंदा तिकीटवाटपात समान पद्धत अवलंबली गेली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याचबरोबर नगरसेवक पदांसाठी सूर्यवंशी कुटुंबातीलच सहा सदस्यांना तिकीट देण्यात आले आहे. या यादीत गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावजय सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणे युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांचा समावेश आहे. त्यामुळे घराणेशाहीच्या आरोपांपासून दूर राहण्याचा दावा करणाऱ्या भाजपवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसाधारण मतदारांमध्ये या निर्णयांबद्दल असंतोषाची भावना व्यक्त होत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षांमधील ‘फॅमिली पॉलिटिक्स’चा प्रभाव किती वाढतो, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.








