Breaking

Collectorate of Buldhana : सातबाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ऑनलाईन करा अर्ज!

 

Apply online for change in 7/12 : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; नागरिकांसाठी ई-महसूल प्रणाली

Buldhana कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. त्यात पुन्हा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होणारी टाळाटळ सहन करावी लागते. पण नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठीच राज्य सरकारने ई-महसूल प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये सातबाऱ्यातील दुरुस्तीसाठी अर्ज करण्यापासून इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरिकांसाठी ई-महसूल प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत ॲानलाईन सेवांच्या विविध ई-प्रणालीचे एकत्रित क्यूआर कोड (QR code) उपलब्ध केले आहेत. हे क्यूआर कोड शेतकरी, नागरिकांनी मोबाइल फोनद्वारे स्कॅन करून लिंकवर क्लिक करू शकतात. त्यानंतर ई महसूल प्रणालीअंतर्गत सुविधांचा लाभ घेऊ शकतात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी म्हटले आहे.

Social Media Efect : व्हॉट्सएपवर आवाहन अन् काही तासांत आली मदत!

या ई-महसूल प्रणालीमध्ये ई-हक्क, ई-चावडी नागरिक पोर्टल, ई-रेकॉर्डस, ई-नकाशा, भुलेख, ई-फेरफार या ॲानलाईन सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ई-हक्क प्रणालीद्वारे सातबाऱ्यावरील ईकरार नोंद, बोजा कमी करणे, बोजा नोंद घेणे, गहाणखत, मयत कुळ वारस, नाव कमी करणे, सातबाऱ्याच्या दुरुस्तीची नोंद करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.

Vidarbha Farmers : मृदा परीक्षणाच्या प्रक्रियेची होतेय ‘माती’!

ई-चावडी पोर्टलद्वारे जमीन महसूल कर पावती पाहता येते. ई रेकॉर्ड्स प्रणालीद्वारे जुना सातबारा, फेरफार, पेरेपत्रक पाहता येतात. ई नकाशा प्रणालीद्वारे शेत जमिनीचा नकाशा पाहता येतो. भुलेख प्रणालीद्वारे ॲानलाईन सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक, ८ अ उतारा पाहता येतो. आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्डच्या क्यूआर कोडद्वारे फेरफार नोटीस, मोजणी नोटीस पाहता येते.

याशिवाय डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक, ८अ उतारा डाऊनलोडसुद्धा करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिकांसाठी या डिजिटल ई महसूल प्रणाली सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, सर्व तहसीलदार कार्यालय,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या ई-प्रणाली सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.