Tensions within ruling allies, heavy police deployment : सत्ताधारी मित्रपक्षांमध्येच तणाव, मोठा पोलिसा बंदोबस्त
Mumbai: नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतदानादरम्यान राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षांमध्येच मोठा संघर्ष उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बदलापूरमध्ये मतदानाच्या दिवशी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांत तुफान राडा झाला. गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँड परिसरात मतदारांना स्लिप वाटप आणि बुथ उभारणीवरून वाद वाढत गेला आणि त्याचे रुपांतर हातघाईच्या भांडणात झाले. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी तत्काळ धाव घेत मोठा फौजफाटा तैनात केला असून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आज राज्यात 250 पेक्षा जास्त नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू असून सकाळपासून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह 43 जागांसाठी मतदान होत असून शहरातील अनेक मतदान केंद्रांवर लवकरच रांगा दिसू लागल्या. गांधी चौकातील मराठी शाळा मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी जमल्याचे चित्र पाहायला मिळाले. शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, अपक्ष संगीता चेंदवणकर आणि आस्था मांजरेकर या पाच उमेदवारांमध्ये काट्याची लढत असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान राज्यातील काही मतदान केंद्रांवर अनियमितता आणि तांत्रिक अडचणींचीही नोंद झाली. बुलढाणा येथे बोगस मतदान करताना एका युवकाला रंगेहात पकडण्यात आले. मतदान प्रतिनिधींनी संबंधित व्यक्तीला चोप दिल्यामुळे शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला, त्यानंतर आरोपी युवकाला इतरांनी पळवून लावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अक्कलकोट नगर परिषदेतील उर्दू शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 9 मधील 2 नंबर खोलीतील ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मतदान थांबले. तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ मशीन बंद राहिल्यामुळे मतदानासाठी लवकर आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
Sudhir Mungantiwar : बल्लारपूर जनतेने दिलेले प्रेम मी सेवेतून फेडणार..!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक काळ रखडल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर या निवडणुका होत असून पक्ष विस्तार, संघटन वाढ, नवीन नेतृत्व घडवणे आणि पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम या दृष्टीने याकडे राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे लक्ष लागून आहे. आज मतदान सुरळीतरीत्या पार पडावे, तसेच हिंसाचार आणि तांत्रिक अडचणींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी यंत्रणा सावध राहत असली तरी काही ठिकाणी घडलेल्या घटनांनी निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मतमोजणी आणि निकालानंतर स्थानिक तसेच राज्य राजकारणात कोणते नवीन चित्र उभे राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








