Major change in the rules of Zilla Parishad and Panchayat Samiti elections : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या नियमांत मोठा बदल
Mumbai : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी लागू असलेल्या नियमांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे ईव्हीएम बॅलेट मशीनवर उमेदवारांचा क्रम ठरवताना आडनावाच्या अद्याक्षराचा आधार घेतला जाणार नाही. नव्या नियमांनुसार सर्वप्रथम मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार, त्यानंतर राज्यस्तरीय व प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आणि शेवटी अपक्ष उमेदवार असा क्रम निश्चित करण्यात आला आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने अधिकृत शासन निर्णय जाहीर केला आहे.
आतापर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारांची नावे मराठी वर्णानुक्रमानुसार, विशेषतः आडनावाच्या पहिल्या अक्षरावरून ईव्हीएमवर क्रमाने लावली जात होती. या पद्धतीमुळे अनेक वेळा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार यादीत खालच्या क्रमांकावर जात होते, तर काही अपक्ष उमेदवार वरच्या क्रमांकावर येत असल्याने वाद आणि तक्रारी होत होत्या. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत अधिक शिस्त आणि एकसंधता आणण्यासाठी शासनाने नियमांमध्ये सुधारणा केल्याचे सांगितले जात आहे.
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून 40 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता
15 डिसेंबर 2025 रोजी ग्रामीण विकास विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची पद्धत पूर्णपणे बदलण्यात आली आहे. निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर उमेदवारांची नावे ठरावीक प्रवर्गांनुसार प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रवर्गांमध्ये प्रथम मान्यताप्राप्त राष्ट्रीय व महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार, त्यानंतर इतर राज्यांतील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार, पुढे राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार आणि शेवटी अपक्ष उमेदवार असा समावेश असेल.
प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांची नावे मराठी वर्णानुक्रमानुसार लावण्याचा निर्णयही नव्या नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आला आहे. उमेदवारांचे आडनाव, त्यानंतर नाव आणि पत्ता या क्रमाने माहिती देण्यात येणार असल्याने नावांच्या क्रमावरून निर्माण होणारा संभ्रम आणि वाद कमी होतील, असा प्रशासनाचा दावा आहे.
या सुधारणेसोबतच राजपत्रात नमुना क्रमांक 3 मध्येही बदल करण्यात आला आहे. नव्या नमुन्यात उमेदवाराचा प्रवर्ग, अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव, पत्ता आणि निवडणूक चिन्ह ही सर्व माहिती एका तक्त्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व प्रवर्गांसाठी अनुक्रमांक सलग ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून स्वतंत्र क्रमांक देण्यास मनाई करण्यात आली आहे.
Local Body Elections : देऊळगाव राजा नगरपरिषद अध्यक्षपदी माधुरी शिपणे
या बदलाचा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर थेट परिणाम होणार आहे. मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार यादीत वरच्या क्रमाने दिसणार असल्याने त्यांना दृश्यमानतेचा फायदा होऊ शकतो, तर अपक्ष आणि लहान पक्षांच्या उमेदवारांची वेगळी आणि स्पष्ट ओळख निर्माण होईल, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. नव्या नियमांमुळे उमेदवार यादीवरून होणारे वाद कमी होतील आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








