Maharashtra politics : आयातांचा बोलबाला मात्र निष्ठावंतांची उपेक्षा !

imported-leaders-rise-loyal-workers-neglected-bjp-fortress-maharashtra : उंच भिंती, उधार विटा: महाराष्ट्रातील भाजपचा किल्ला किती अभेद्य?

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाकडे पाहिलं, तर भाजपचा विजय हा आकड्यांचा खेळ जिंकणारा असला तरी संघटनात्मक वास्तव मात्र अस्वस्थ करणारा आहे. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप “नंबर वन” ठरत असल्याचं चित्र आकडेवारीतून दाखवलं जात असलं, तरी प्रत्यक्ष सत्ताकारण आणि संघटनात्मक ताकद यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली स्पष्टपणे दिसते. नगरपालिकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही अनेक ठिकाणी भाजपकडे बहुमत नाही, काही ठिकाणी तर एकही नगरसेवक नसताना नगराध्यक्ष भाजपचा आहे. ही स्थिती राजकीय चातुर्याचं लक्षण मानली जाऊ शकते, पण ती दीर्घकालीन संघटनात्मक मजबुतीची खूण नक्कीच नाही.

भाजपचा सध्याचा विजय प्रामुख्याने “आयात नेतृत्व” आणि सत्तेच्या आकर्षणावर उभा असल्याचा आरोप विरोधक करतात, पण धक्कादायक बाब म्हणजे हीच खदखद आता पक्षाच्या आतल्या मूळ कार्यकर्त्यांमध्येही दिसू लागली आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी रस्त्यावर झगडलेले, संघटनेची वीट रचलेले कार्यकर्ते बाजूला पडत आहेत आणि बाहेरून आलेले, कालपरवा विरोधात असलेले चेहरे थेट सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचत आहेत. यामुळे “निष्ठेपेक्षा संधी महत्त्वाची” असा संदेश गेला असून, तो भाजपच्या संघटनात्मक डीएनएला छेद देणारा आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात होईल चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा ताकदवान, निर्णायक आणि आक्रमक नेत्याची आहे, यात शंका नाही. मात्र हीच ताकद हळूहळू एकांगीपणात रूपांतरित होत असल्याची भावना पक्षांतर्गत पातळीवर वाढते आहे. दरारा निर्माण झाला, पण संवाद, आपुलकी आणि विश्वास कमी झाल्याचे लक्षण आहे. ज्येष्ठ नेते औपचारिकपणे सोबत दिसतात, पण मनाने जोडले गेले आहेत का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांसारख्या भाजपच्या मूळ नेत्यांना क्रमाक्रमाने बाजूला काढण्यामागे नेमकं काय कारण होतं, हा सवाल आजही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मतभेद सहन न होणं, की स्वतःपेक्षा बलाढ्य सहकारी पुढे येतील या भीतीपोटी त्यांचे पंख छाटले गेले, याचं उत्तर नेतृत्वाने कधीच स्पष्टपणे दिलेलं नाही.

नितीन गडकरी यांनी दिलेला इशारा आज अक्षरशः समोर उभा आहे. आयात नेते संधी मिळेल तेव्हा पक्ष बदलतात, तर शेवटपर्यंत उभा राहतो तो जमिनीवरचा कार्यकर्ता. आज महाराष्ट्रात भाजपचा किल्ला उंच भिंतींचा, मोठ्या तोफांचा दिसतो, पण त्या भिंतींच्या विटा उधारच्या आहेत. सत्ता टिकते आहे, पण पाया पोखरला जात आहे. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा हा आजही भाजपचा सर्वात मोठा आधार आहे, पण राजकारणात करिष्म्याचं वलय कायम राहत नाही. उद्या परिस्थिती बदलली, तर महाराष्ट्रात भाजपकडे फडणवीसांनंतरचा स्वीकारार्ह, स्वाभाविक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे का, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. जर उत्तर नकारार्थी असेल, तर नेतृत्व घडवण्याऐवजी नेतृत्व दाबून ठेवण्यातच जास्त ऊर्जा खर्च झाली, हे मान्य करावं लागेल.

आज ५६ पक्षांतून आलेल्या नेत्याला मंत्रिपद देताना, आयुष्यभर पक्षासाठी काम केलेल्या निष्ठावंतांना डावललं जात असेल, तर हा फक्त सत्तेचा विजय ठरतो, संघटनेचा नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी संघर्षातून पक्ष उभा केला; आज मात्र सत्ता हातात आल्यानंतरच पक्षाचा कणा कमकुवत होत असल्याचं चित्र आहे. ही रणनीती अल्पकालीन यश देऊ शकते, पण दीर्घकाळात तीच भाजपसाठी सर्वात मोठा धोका ठरू शकते.

Municipal election : महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी चर्चा सुरु

आज भाजप महाराष्ट्रात जिंकतो आहे, पण प्रश्न असा आहे की तो कोणाला सोबत घेऊन आणि कोणाला मागे टाकून जिंकतो आहे. जर “आयराम-गयराम” संस्कृतीला तत्वनिष्ठ राजकारणापेक्षा जास्त महत्त्व दिलं जात असेल, तर अटलजींनी दिलेल्या वैचारिक वारशाशी आपण प्रामाणिक आहोत का, हा प्रश्न प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. कारण इतिहास सत्ता किती काळ होती यावर नाही, तर संघटना किती मजबूत ठेवली यावर निर्णय देतो.