13-Hour Drama Over Validity of Nomination Papers : रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष व भाजपमध्ये वाद
Amravati साईनगर–अकोली प्रभाग क्रमांक १९ मधून युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या नामनिर्देशन अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता, मात्र आमदार रवी राणा यांनी पाच वकिलांची फौज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उभी केली. मुंबई महापालिका अधिनियम, कंत्राट व परवाना आदी मुद्द्यांवर सखोल खल झाला. अखेर तब्बल १३ तासांच्या ‘हायव्होल्टेज ड्रामा’नंतर सचिन भेंडे यांचे नामनिर्देशन वैध ठरविण्यात आले. या निर्णयानंतर युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री बडनेरात जल्लोष केला.
भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी बुधवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे वायएसपीचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदविला होता. ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत या विषयावर अधिकाऱ्यांमध्ये चर्चा व मंथन सुरू होते.
दरम्यान, दोन्ही बाजूंकडून राजकीय नेत्यांचे अधिकाऱ्यांना फोन, दबावतंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा होती. बडनेरा झोन कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सचिन भेंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद होणार की कायम राहणार, याबाबत दिवसभर तर्कवितर्क लावले जात होते. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती.
Nagpur Municipal Corporation Elections : अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, खोलीत डांबून ठेवले
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सचिन भेंडे यांची बाजू मांडण्यासाठी दीप मिश्रा, आशिष लांडे, धनंजय तोटे, जुबेर अहमद, शुभम खाजोने या विधितज्ज्ञांनी युक्तिवाद केला. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब दराडे यांनी उशिरा रात्री सचिन भेंडे यांचे नामनिर्देशन वैध ठरविण्याचा आदेश दिला. आदेश जाहीर होताच युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काही वेळाने आमदार रवी राणा समर्थकांसह बडनेरा झोन कार्यालयात दाखल झाले.
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा
भारतीय, भेंडे यांची उच्च न्यायालयात धाव
सचिन भेंडे यांचे नामनिर्देशन वैध ठरविल्याच्या निर्णयाविरोधात तुषार भारतीय यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. तर, सचिन भेंडे यांनी आपल्या नामनिर्देशनाच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयात कॅवेट दाखल केली आहे. भेंडे यांनी साईनगर–अकोली प्रभाग क्रमांक १९ मधून उमेदवारी दाखल केली आहे.
कायदेशीर अहवाल अप्राप्त असतानाही नामनिर्देशन वैध
प्रभाग क्रमांक १९ ड साठी सचिन भेंडे यांचे नामनिर्देशन २९ डिसेंबर रोजी दाखल झाले होते. तुषार भारतीय यांनी भेंडे हे महापालिकेचे कंत्राटदार असून त्यांच्या कामाचा डिफेक्ट लायबिलिटी पीरियड सुरू असल्याचा आक्षेप घेतला. हा कालावधी हस्तांतरित करता येतो का, याबाबत महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी ३१ डिसेंबर रोजी विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांच्याकडे कायदेशीर मत मागविले होते. मात्र, आयुक्तांनी मागविलेला कायदेशीर अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सचिन भेंडे यांचे नामनिर्देशन वैध ठरविले, हे विशेष.








