Political U-Turns: Leader Moves from Congress to Thackeray Camp, now in Shinde Camp : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, प्रा. सुनिल सपकाळ यांचा शिंदेसेनेत प्रवेश
Buldhana उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (उबाठा) बुलढाण्यात मोठा राजकीय धक्का बसला असून, माजी काँग्रेस नेते प्रा. सुनिल सपकाळ यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच उबाठामध्ये प्रवेश केलेल्या प्रा. सपकाळ यांनी आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ४ जानेवारी रोजी शिवसेनेची वाट धरली.
नगरपालिका निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीतील वाटाघाटींमध्ये प्रभाग क्रमांक १५ हा उबाठाच्या वाट्याला गेल्याने प्रा. सपकाळ यांनी काँग्रेसचा त्याग करत उबाठात प्रवेश केला होता. मात्र अपेक्षित राजकीय दिशा व नेतृत्व न मिळाल्याने त्यांनी उबाठाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Municipal Council : शहराला समस्यांचा विळखा, नव्या नगराध्यक्षांपुढे मोठे आव्हान!
मातोश्री जनसंपर्क कार्यालयात जाहीर प्रवेश
आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयात प्रा. सुनिल सपकाळ यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे प्रा. सपकाळ हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निकटवर्तीय भावकीतील असल्याने, त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेससह उबाठा गटालाही अप्रत्यक्ष धक्का बसल्याचे मानले जात आहे.
शिवसेनेत वैचारिक कार्यकर्त्याची भर
प्रा. सुनिल सपकाळ यांनी काँग्रेस पक्षात असताना विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, त्यांचा प्रशासकीय व संघटनात्मक अनुभव शिवसेनेला लाभणार आहे. वैचारिक बैठक असलेला, अभ्यासू कार्यकर्ता शिवसेनेत दाखल झाल्याने संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.








