Thackeray brothers aggressive in joint interview, determined to ‘save Mumbai’ : संयुक्त मुलाखतीत ठाकरे बंधू आक्रमक, ‘मुंबई वाचवा’चा निर्धार
Mumbai: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी मुंबई, मराठी अस्मिता आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी महापालिका निवडणुकीत युती होणार असल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत समोर आली असून त्यात त्यांनी “मुंबई आणि मराठी माणसाचा डेथ वॉरंट काढलं जातंय” असा गंभीर आरोप केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे बंधूंनी मुंबईबाबतचे व्हिजन, भाजप व महायुती सरकार, भ्रष्टाचार, मुंबईतील परप्रांतीयांचे वाढते लोंढे आणि प्रशासनाची मानसिकता अशा विविध मुद्द्यांवर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध झाल्यानंतरच मोठी चर्चा रंगली होती आणि आता पहिल्या भागात दोघांचे सडेतोड उत्तर समोर आले आहे.
Municipal elections : बावनकुळे यांच्या समोरच ‘एबी फार्म चोर’, ‘२०० युनिट चोर’च्या घोषणां
मुंबईच्या प्रश्नांवर बोलताना संजय राऊत यांनी “महाराष्ट्रात मराठी माणसाचं डेथ वॉरंट निघत आहे” असे विधान केले. त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमुखाने सहमती दर्शवली. “ही माणसं स्वतः बसलेली नाहीत, त्यांना बसवलेलं आहे. त्यांच्या हातात फक्त फायली येतात आणि सही करायला सांगितली जाते. आपण काय करतोय, याचे परिणाम मराठी माणसांना अजून पूर्णपणे समजलेले नाहीत, पण लवकरच त्याची जाणीव होईल,” असे राज ठाकरे म्हणाले. मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचंच डेथ वॉरंट काढलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना राज ठाकरे यांनी ‘मूळ मुंबईकर’ ही संकल्पना मांडली. “आपण सगळे मुंबईकर आहोत, इथे जन्मलो, वाढलो. पण सध्याच्या सत्तेतले अनेक जण बाहेरचे आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. मुंबईचे प्रश्न इथे जन्म न घेतलेल्या व्यक्तींना कळणारच नाहीत,” असे ते म्हणाले. मुंबईकडे बाहेरून पाहणाऱ्यांना इथली समस्या कधीच जाणवणार नाही, कारण रस्ते, पाणी, वीज, हॉस्पिटल्स सगळं दिसायला उपलब्ध वाटतं, पण या शहराचं वास्तव वेगळं आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकांतील बिनविरोध उमेदवारांच्या मुद्द्यावरही ठाकरे बंधूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “बिनविरोध निवडणूक म्हणजे मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणं आहे,” असा सवाल महेश मांजरेकर यांनी उपस्थित केला. त्यावर राज ठाकरे यांनी “व्होटिंग मशीनवर नोटाचा अधिकार आहे, पण नोटांमुळेच हा सगळा गोंधळ झाला,” अशी सूचक टिप्पणी केली. उद्धव ठाकरे यांनीही “वाटलेल्या नोटांमुळेच हा प्रश्न निर्माण झाला,” असे म्हणत अप्रत्यक्ष आरोप केला.
बिनविरोध निवडणुकांवर उपाय सुचवताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जसं एखाद्या टेंडरमध्ये गफलत वाटली तर री-टेंडर काढलं जातं, तसंच अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्यायला हवी. मात्र निवडणूक आयोग निकाल थांबवून ठेवतोय आणि सर्व निकालांसोबतच जाहीर करणार आहे, कारण आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम बनला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. “बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये आमचा किंवा राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नाही, हा योगायोग आहे का?” असा सवाल करत त्यांनी संशय व्यक्त केला.
Municipal elections : बावनकुळे मंचावर असतानाच भाजपाच्या अन्यायग्रस्तांचा आक्रोश उफाळला !
आगामी 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीने आणि ‘मुंबई वाचवा’ या घोषणेनं राज्याचं राजकारण तापलं असून, मुंबईचा महापौर मराठी माणूसच असावा, या मुद्द्यावर ठाकरे बंधू थेट रिंगणात उतरल्याचं स्पष्ट झालं आहे.








