Raju Shetti meets the Thackeray brothers : मराठी जनतेच्या हक्कांसाठी साथ देत असल्याचा दावा
Mumbai ठाकरे बंधू सतत मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मराठी माणसाला वाचवायचं असेल तर ठाकरे ब्रँडला पाठिंबा द्यावा, असं आवाहन करत आहेत. आता या पार्श्वभूमीवर ठाकरेंची ताकद दुप्पट करणारी घटना घडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केला आहे.
राजू शेट्टी हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला आहे. त्यांच्या संघटनेने ग्रामीण भागात मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ते म्हणाले की, “वैचारिक मतभेद असले तरी मुंबईत मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणार्या ठाकरे बंधूंची महापालिकेत सत्ता यावी यासाठी त्यांना माझा पाठिंबा आहे.”
धाराशीव-सोलापूर सीमेवरील शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकर्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते. मेळाव्यानंतर पत्रकरांशी त्यांनी संवाद साधला.
राज्यात इतर महापालिकेत राजू शेट्टी यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र मुंबईत त्यांनी ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा दिला आहे. “महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला किती पठवले त्याची माहिती घ्या म्हणजे त्यावरुन मराठीवर मुख्यमंत्र्यांचे प्रेम दिसून येईल.” असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच मुंबईत मराठी महापौर हवा असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत नेहमीच मराठी जनतेच्या हक्कांचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. या पाठिंब्यामुळे ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत फायदा होईल की नाही, हे १६ तारखेलाच कळणार आहे.








