So what has he done in all these years CM Fadnavis question to Raj Thackeray : तर इतक्या वर्षांत काय केलं? मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना सवाल
Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न समजत नाहीत, असे विधान करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्र्यांनी थेट आणि टोचून उत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना “यापेक्षा जास्त नैराश्य दुसरे काय असू शकते?” असे म्हणत उलट सवाल उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी “देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत, बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबईचे प्रश्न कळत नाहीत. मुंबईत जन्माला आलेल्यालाच इथली परिस्थिती समजते,” असे विधान केले होते. या वक्तव्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसले आणि त्यांनी या भूमिकेची खिल्ली उडवली. “उद्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जन्माला यायचं? देश समजण्यासाठी कुठे जन्माला यावं लागतं?” असा थेट सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला.
Digital Census : १८७२ नंतर पहिल्यांदाच ‘पेपरलेस’ जनगणना; २०२७ साठी मेहकर तालुक्यात जय्यत तयारी
फडणवीस म्हणाले की, गुजरातमध्ये जन्मलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अंदमानपर्यंत देशाची जेवढी माहिती आहे, तेवढी कदाचित कुणालाच नसेल. जन्माच्या आधारावर प्रशासन आणि विकास समजतो, ही भूमिका चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे राज ठाकरे यांना थेट आव्हान देत प्रश्न उपस्थित केला. “समजा एका मिनिटासाठी मान्य केलं की मला मुंबई कळत नाही आणि तुम्हाला कळते. मग इतक्या वर्षांत तुम्ही काय केलं? मुंबईतील मराठी माणसासाठी काय केलं? मराठी माणसाला मुंबई सोडून दूर घर घ्यावं लागलं, त्यासाठी कोण जबाबदार आहे?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
Chikhali Politics : चिखलीत सत्ताधारी–विरोधकांचा सूर जुळला! गढूळ राजकारणात सलोख्याची ‘तुरटी’
मुंबई महापालिकेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, तब्बल २५ वर्षे महापालिका चालवली गेली, पण त्या काळात कोणत्या मोठ्या पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या, हा प्रश्न आहे. “मुंबईत पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात उड्डाणपूल नागपूरमधून आलेल्या नितीन गडकरींनी बांधले. तब्बल ५५ उड्डाणपूल उभे राहिले. वरळी-वांद्रे सी लिंक बांधली गेली आणि तिथून मुंबईच्या विकासाला खरी सुरुवात झाली. त्यानंतर माझ्या काळात आणि एकनाथ शिंदे यांच्या काळात विकास पुढे गेला,” असे फडणवीस म्हणाले.
“आम्ही मुंबईत जन्मलो नाही, हा आमचा दोष नाही. पण मुंबईत जन्मलेल्यांनी आधी हा हिशेब द्यावा की त्यांच्या सत्ताकाळात त्यांनी नेमकं काय केलं,” असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर जोरदार पलटवार केला. जन्माच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यामागे विकासाऐवजी नैराश्य दिसत असल्याचा टोला त्यांनी या माध्यमातून लगावला.
___








