Asaduddin Owaisi : ओवेसींच्या दोन सभांनंतर एआयएमआयएम आक्रमक; काँग्रेसची पारंपरिक मते धोक्यात!

Congress comes under a scathing attack over the riot issue : दंगलीच्या मुद्द्यावरून ओवेसींचा काँग्रेसवर घणाघाती प्रहार; ३२ उमेदवारांमुळे अकोल्यात तिरंगी लढत?

Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सलग दोन जाहीर सभांनी शहराचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. रविवारी आणि शनिवारी झालेल्या या सभांनंतर शहरात ‘एमआयएम’ची लाट निर्माण झाली असून, याचा थेट फटका काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३२ उमेदवारांच्या जोरावर ओवेसींनी अकोल्यात काँग्रेसच्या ‘पैलवानां’ना थेट आव्हान दिले असून, मुस्लिमबहुल प्रभागांमध्ये आता काँग्रेस विरुद्ध एमआयएम असा अटीतटीचा सामना रंगणार आहे.

ओवेसी यांनी आपल्या भाषणात २०२३ मधील अकोल्यातील दंगलीचा संदर्भ देत काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. “जेव्हा अकोल्यात दंगल झाली, तेव्हा काँग्रेसचे हे मोठे पैलवान कुठे होते? संकटाच्या काळात एकही काँग्रेस नेता मैदानात उतरला नाही, मात्र आमचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धावले,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तसेच, केंद्रातील ‘यूएपीए’ (UAPA) आणि वक्फ कायद्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी काँग्रेसने भाजपला छुप्या पद्धतीने साथ दिल्याचा आरोप केला. यामुळे काँग्रेसच्या मुस्लिम मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Akash Fundkar : कामगार कल्याणावर विरोधकांचा दुटप्पीपणा; भाजप–राष्ट्रवादी युतीला विजयी करा

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा एमआयएमने अकोल्यात आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. तब्बल ३२ प्रभागांत उमेदवार उभे करून ओवेसींनी अकोला महापालिकेवर आपली पकड निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. ओवेसींच्या सभांना झालेली प्रचंड गर्दी आणि मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, काँग्रेसच्या अनेक दिग्गज उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. अनेक प्रभागांत काँग्रेसच्या प्रचारात मरगळ आली असून, कार्यकर्ते आता बचावात्मक पवित्रा घेताना दिसत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ओवेसींच्या या आक्रमक प्रचारामुळे मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होणार आहे. याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो, तर काँग्रेससाठी हा अस्तित्वाचा लढा ठरला आहे. दंगलीच्या काळातील मदतीचा दाखला देऊन ओवेसींनी भावनिक साद घातल्याने तरुण मतदारांचा कल एमआयएमकडे झुकताना दिसत आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात अकोल्यातील जनता ‘पंजा’ला साथ देते की ‘पतंग’ उडवते, यावर शहराच्या भविष्यातील सत्तेचे गणित अवलंबून आहे.