BMC Election: निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बांधुनी भाजपला कोंडीत पकडले !

Allegations of political vendetta, a decisive attack on the Marathi issue : राजकीय सूडभावनेचे आरोप, मराठीच्या मुद्द्यावर निर्णायक हल्ला

Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या ऐतिहासिक सभेत ठाकरे बंधूंनी भाजपाला राजकीय कोंडीत पकडल्याचे चित्र स्पष्ट झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या सभेतून त्यांनी मराठी अस्मिता, मुंबईवरील हक्क आणि राजकीय सूडभावनेचे आरोप या मुद्द्यांवरून भाजपासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

ठाकरे बंधूंनी आपल्या भाषणातून १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे, तसेच मराठी माणसाला हळूहळू दुय्यम ठरवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी मराठी समाजाला सावध केले. मुंबई महाराष्ट्राच्या हातातून निसटत असल्याचा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सत्तेच्या जोरावर विरोधकांना संपवण्याचे आणि संस्थांचा गैरवापर करण्याचे आरोप केले.

Sudhir Mungantiwar : श्रीरामांना काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या विचारांवरच रावणछाया

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मराठी मतदारांना भावनिक आणि थेट आवाहन केले. मराठी माणसासाठी ही शेवटची संधी असल्याचे सांगत, आपापसातील संघर्ष थांबवण्याचा सल्ला त्यांनी दिला. मराठी समाजात फूट पडावी हीच भाजपाची रणनीती असल्याचा दावा करत, त्यांना हवे असलेले काहीही देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या भाषणाने शिवाजी पार्कमध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे दिसून आले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईतील शिवसेनेच्या पारंपरिक मतांमध्ये झालेल्या विभागणीचा फटका उद्धव ठाकरे गटाला बसला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील या अनुभवातून धडा घेत, मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ठाकरे हे नाव, शिवाजी पार्कशी जोडलेली भावनिक नाळ आणि मराठी अस्मितेचा मुद्दा यांच्या जोरावर पारंपरिक शिवसैनिक आणि मराठी मतदार पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास या सभेतून व्यक्त करण्यात आला.

Sudhir mungantiwar : वडेट्टीवारांचे आरोप म्हणजे भुलभुलय्या!

१५ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे ठाकरे बंधूंनी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न मानता मराठी अस्मितेची निर्णायक लढाई म्हणून पाहण्याचे आवाहन केले. या सभेमुळे मुंबईच्या राजकारणात समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, ही एक गंभीर राजकीय आव्हानात्मक परिस्थिती ठरत असल्याचे मानले जात आहे.