All four positions go to BJP : सत्तासमीकरणांवर मजबूत पकड, पहिल्या सर्वसाधारण सभेतस्वीकृत सदस्यांची निवड
Khamgao खामगाव नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष चंद्रशेखर पुरोहित यांची निवड झाली असून, स्वीकृत सदस्यपदी भाजपचे प्रमोद अग्रवाल, रामानुज मिश्रा, अॅड. रमेश भट्टड यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. चौथ्या स्वीकृत सदस्यपदासाठी काढण्यात आलेल्या ईश्वरचिठ्ठीत भाजपचा क्रमांक निघाल्याने संजय (मुन्ना) पूरवार यांची निवड झाली. या निवडीमुळे नगरपरिषदेवर भाजपचा राजकीय प्रभाव अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी अर्पणा फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता नगरपरिषद सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत उपाध्यक्ष व चार स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, उपमुख्याधिकारी आनंद देवकते, तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.
Education Policy : “२५ वर्षे सेवा केली, आता परीक्षा द्यायची का?” बुलढाण्यात शिक्षकांचा संताप
उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून संतोष पुरोहित, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून शाह तहसीन शाह कासम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्यानंतर हात वर करून मतदान घेण्यात आले. एकूण ३६ सदस्यांनी मतदान केले. त्यामध्ये संतोष पुरोहित यांना ३० मते, तर शाह तहसीन शाह कासम यांना ६ मते मिळाली. त्यामुळे संतोष पुरोहित यांनी २४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.
स्वीकृत सदस्यांच्या निवड प्रक्रियेत पक्षीय बलाबलानुसार भाजपकडून प्रमोद हस्सुखराय अग्रवाल, रामानुज जगदीश मिश्रा, अॅड. रमेश रमणलाल भट्टड यांची अविरोध निवड झाली. चौथ्या स्वीकृत सदस्यपदासाठी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) या तीन पक्षांमध्ये ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. ही ईश्वरचिठ्ठी चिमुकली सुहानी बनसोड हिच्या हस्ते काढण्यात आली. त्यात भाजपचा क्रमांक निघाल्याने भाजपचे संजय (मुन्ना) पूरवार यांची निवड जाहीर करण्यात आली. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी सभागृहात जल्लोष केला.
उपाध्यक्षपदासह स्वीकृत सदस्यांच्या चारही जागांवर भाजपने वर्चस्व मिळवल्याने, आगामी काळात नगरपरिषदेतील धोरणात्मक निर्णय, विकासकामे व समित्यांच्या रचनेवर भाजपचा प्रभाव राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खामगाव पालिकेतील पुढील राजकीय हालचालींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








