Maharashtra Municipal Election 2026 : मतदार यादीत नावापुढे ‘डबल स्टार’ असल्यास विशेष तपासणी
Mumbai महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर, मतदार यादीतील ‘दुबार’ (Duplicate) नावांमुळे होणारा संभाव्य गोंधळ आणि बोगस मतदानाचा धोका टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी किंवा एकाच प्रभागात दोनदा आढळली आहेत, त्यांच्यासाठी आता मतदानाचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. अशा मतदारांना आपली ओळख पटवण्यासाठी आता चक्क दोन ओळखपत्रे आणि एक विशेष हमीपत्र सादर करावे लागणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादीचे अद्ययावतीकरण करताना सुमारे १० लाखाहून अधिक संशयास्पद किंवा दुबार नावे शोधून काढली आहेत. ज्या मतदारांचे नाव दुबार आहे, त्यांच्या नावापुढे मतदार यादीत ‘२ स्टार’ (Double Star) असे चिन्ह देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर जर एखाद्या मतदाराच्या नावापुढे हे चिन्ह दिसले, तर संबंधित मतदान केंद्राध्यक्षांकडून त्याची सखोल चौकशी केली जाईल. केवळ मतदार ओळखपत्र (EPIC) असून चालणार नाही, तर त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी आणखी एक पुरावा देणे अनिवार्य असेल.
Murlidhar Mohol on Ajit Pawar : आरोप सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्त होईन
केवळ ओळखपत्रावर ही प्रक्रिया थांबणार नाही. दुबार नाव असलेल्या मतदाराला एक लेखी हमीपत्र (Declaration) देखील द्यावे लागेल. या हमीपत्रात, “मी यापूर्वी कोणत्याही इतर ठिकाणी मतदान केलेले नाही आणि भविष्यातही या निवडणुकीत दुसऱ्यांदा मतदान करणार नाही,” असे स्पष्टपणे नमूद करावे लागेल. जर एखाद्याने चुकीची माहिती देऊन दोनदा मतदान करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
राज्यातील विरोधी पक्षांनी मतदार यादीत लाखो बोगस नावे असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. या तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही नवी नियमावली जाहीर केली आहे. “आम्ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दुबार नावे चिन्हांकित केली आहेत. मतदान केंद्रावरील अधिकारी (BLO) आणि केंद्राध्यक्ष यांना अशा मतदारांची विशेष तपासणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे,” असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Municipal Elections : कुठे कोट्यवधींची रोकड तर कुठे राडे, रात्रभर कोंबिंग ऑपरेशन
गुरुवारी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडणार असून, आयोगाच्या या निर्णयामुळे बोगस मतदानाला मोठा लगाम बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ज्या मतदारांच्या नावापुढे स्टार आहे, त्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपली मूळ ओळखपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








