Vote splitting has cost the BJP in ten seats : मतांची फाटाफूट झाल्यामुळे तब्बल दहा जागांवर फटका
Akola अकोला महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. अपेक्षेप्रमाणे मतांचे ध्रुवीकरण झाले असले, तरी बहुमताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजपच्या संख्याबळाच्या गाडीला उंबरठ्यावरच ‘ब्रेक’ लागला. मतांची फाटाफूट झाल्यामुळे भाजपला तब्बल दहा जागांवर फटका बसला. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या दहा जागा कमी झाल्याने हा निकाल पक्षासाठी धक्कादायक मानला जात आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता सत्ता समीकरण जुळवण्याची कसरत भाजप नेतृत्वाला करावी लागणार आहे.
अकोला महापालिकेच्या २० प्रभागांतील ८० जागांसाठी ही निवडणूक पार पडली. मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. भाजप बहुमताच्या जवळ असली, तरी सर्वपक्षीय मोट बांधल्यास विरोधकांनाही सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते.
Akola Mayor Election 2026 : अकोल्यात सत्तेचा पेच; आता महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष!
या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली, तर शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर उतरून मित्र पक्षालाच थेट आव्हान देताना दिसली. शिवसेना ठाकरे गटही स्वतंत्रपणे मैदानात होता. काही प्रभागांत वंचित बहुजन आघाडीचाही प्रभाव जाणवला. परिणामी, अपेक्षेप्रमाणे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन झाले आणि त्याचा मोठा फटका भाजपला बसला. मतविभाजनाच्या या समीकरणामुळे भाजपला तब्बल दहा जागा गमवाव्या लागल्या.
Amravati Municipal Corporation Election : भाजप-काँग्रेसला घ्याव्याच लागतील इतर पक्षांच्या कुबड्या!
या प्रभागांत भाजपला फटका
प्रभाग क्रमांक २ (क) मध्ये भाजपचा २५४ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) ला ८२१ मते मिळाली.
प्रभाग २ (ड) मध्ये भाजप ७८२ मतांनी पराभूत झाली, तर शिवसेना व अपक्ष उमेदवारांना मिळून १,३२२ मते मिळाली.
प्रभाग ४ (ड) मध्ये भाजपला ५२० मतांनी पराभव स्वीकारावा लागला असून शिवसेनेला १,१८५ मते मिळाली.
प्रभाग ८ (अ) मध्ये भाजपचा ३०२ मतांनी पराभव झाला, तर शिवसेनेच्या उमेदवाराला (धनुष्यबाण) १,२८३ मते मिळाली.
प्रभाग १७ (ड) मध्ये काँग्रेसने भाजपवर ७८७ मतांनी विजय मिळवला. या प्रभागात शिवसेनेला २,५७६ मते मिळाली आहेत.
मतविभाजनामुळे भाजप बहुमतापासून दूर राहिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले असून, पुढील सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना आता वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.








