BJP loyalists’ outcry against Ayaram culture : आयाराम संस्कृतीविरोधात भाजपमधील निष्ठावंतांचा आक्रोश !
Nagpur : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर या निर्णयामागील खरा राजकीय अर्थ आता अधिक ठळकपणे समोर येत आहे. जोशी यांनी आपल्या पत्रात थेट नाव न घेता “सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर आणि संधीसाधूपणा निष्ठावान कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत आहे,” असे म्हटले असले, तरी हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून भाजपमधील निष्ठावंतांच्या दडपलेल्या भावना आणि खदखदीचे ते प्रतीक मानले जात आहे.
संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. नागपूरमधील राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक कामकाजात जोशी यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत, ‘नागपुरातील मुख्यमंत्री फडणवीस यांची सगळी सूत्रे जोशीच सांभाळतात’ अशीच धारणा आहे. अशा व्यक्तीनेच राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेतल्याने, हा निर्णय किती गंभीर परिस्थितीचे द्योतक आहे, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
Malkapur Congress : स्वीकृत नगरसेवक निवडीत अन्याय, निष्ठावानांची निर्धार सभा
भाजपमध्ये सध्या आयाराम नेत्यांची संख्या वाढत असून, पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना खोलवर रुजली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी बाहेरून आलेल्या नेत्यांना पदे, संधी आणि प्रतिष्ठा दिली जात असताना, संघातून वाढलेले, पक्षासाठी संघर्ष केलेले कार्यकर्ते दुय्यम ठरत असल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. हीच खदखद संदीप जोशी यांच्या निर्णयातून व्यक्त झाल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळच्या व्यक्तीने “आता आपणच थांबावे” असा निर्णय घेणे, ही केवळ वैयक्तिक निवृत्ती नसून भाजपमधील अंतर्गत अस्वस्थतेचा मोठा इशारा मानला जात आहे. सातत्याने येणारी उपेक्षा, बदलते राजकीय गणित, सत्ताकेंद्रित निर्णय आणि निष्ठेपेक्षा संधीसाधूपणाला मिळणारे महत्त्व, या सगळ्याचा थेट परिणाम म्हणूनच हा खळबळजनक निर्णय घेतला गेल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जोशी यांनी आपल्या पत्रात कुणावरही थेट आरोप न करता अत्यंत सुसंस्कृत भाषेत भूमिका मांडली असली, तरी त्यांच्या शब्दांमधून निष्ठावंत कार्यकर्त्यांची वेदना स्पष्टपणे झिरपते. “माझ्या असण्यामुळे कुणावर अन्याय होऊ नये,” हे वाक्य अनेक अर्थांनी बोलके मानले जात आहे. भाजपमध्ये आजही संधी मिळू शकते, याची खात्री असूनही त्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला, यामागे केवळ वैयक्तिक समाधान नव्हे, तर पक्षांतर्गत अन्यायाविरोधातील मौन निषेध दडलेला असल्याची चर्चा आहे.
या निर्णयानंतर नागपूरसह राज्यभरातील जुन्या भाजप कार्यकर्त्यांकडून संदीप जोशी यांच्या भूमिकेला मौन पाठिंबा मिळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी “हा निर्णय चुकीचा आहे” असे मत व्यक्त होत असले, तरी त्याच वेळी “जोशी बोलले नाहीत, पण जे बोलायला हवे होते ते त्यांनी कृतीतून दाखवले,” अशी भावना निष्ठावंतांमध्ये उमटत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याने घेतलेला हा निर्णय भाजप नेतृत्वासाठी केवळ वैयक्तिक निवृत्ती न राहता, पक्षातील निष्ठावंतांचा इशारा ठरतो का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सत्तेच्या राजकारणात निष्ठेची किंमत कमी होत चालली आहे का, आणि याचा फटका पक्षाला भविष्यात बसणार का, हा प्रश्न संदीप जोशी यांच्या ‘आता मी थांबतोय’ या एका वाक्यातून तीव्रपणे उपस्थित झाला आहे.








