Sanjay Raut rejects claim of Fadnavis -Thackeray secret discussions : फडणवीस – ठाकरे गुप्त चर्चांचा दावा संजय राऊतांनी फेटाळला
Mumbai : मुंबईच्या महापौरपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गुप्त चर्चा सुरू असल्याच्या बातम्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व चर्चांना ठाम शब्दांत फेटाळून लावले आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. ठाकरे – भाजपात बोलणी सुरू असल्याचे जे काही सांगितले जात आहे, त्या सगळ्या केवळ वृत्तपत्रीय बातम्या आहेत. आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही,” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महापौरपदाच्या निवडणुकीवेळी ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक गैरहजर राहणार असल्याच्या चर्चांमागे राजकीय खेळी असल्याचा आरोपही राऊत यांनी अप्रत्यक्षपणे केला. “मुंबईचा महापौर कोण होणार हे आता मुंबईकर ठरवत नाहीत. ते भाजप आणि गौतम अदानी ठरवतील,” अशी जहरी टीका करत राऊत यांनी भाजपवर थेट बोट ठेवले. मुंबईकरांनी दिलेल्या कौलानुसार भाजप कितीही जागा जिंकत असला, तरी तो नैतिक विजय नाही, असा दावा त्यांनी केला.
Weather update : राज्यात थंडीचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ – उत्तर महाराष्ट्रात शीतलहरीचा इशारा
मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापौरपदावरून महायुतीतच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्पष्ट बहुमत नसल्याने महापौरपदासाठी राजकीय गणिते आखली जात आहेत. अशातच ठाकरे गटाचे नगरसेवक गैरहजर राहून निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी रणनीती आखली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटासोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात महापौरपदावरून सुरू असलेली रस्सीखेच लपवण्यासाठी ठाकरेंना मध्ये ओढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “स्वतःचा मोलभाव वाढवण्यासाठी ठाकरेंना ऑफर देणे किंवा ठाकरेंकडून प्रस्ताव असल्याचे लुटूपुटुचे डाव खेळू नयेत. तुम्हाला टीका करायलाही ठाकरेच लागतात आणि सत्तेत बसण्यासाठी दबावतंत्रासाठीही ठाकरे कार्डच का वापरावे लागते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Sandeep Joshi : मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याचा ‘थांबण्याचा’ निर्णय
ठाकरेंचे नगरसेवक कुठेही नॉटरीचेबल नसून ते कोणत्याही हॉटेलमध्ये डांबून ठेवलेले नाहीत, असे सांगत अंधारे यांनी ‘टेबल न्यूज’ पसरवणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. “लोकांनी दिलेला विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षा लाखमोलाचा आहे. आम्ही लढतोय आणि लढत राहू. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या शिवाय,” असे ठणकावून सांगत त्यांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केले. “एकनाथ शिंदेंना महापौरपदासाठी दिल्लीतून चावी लावली जात आहे. मुंबईत भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा महापौर होऊ नये, यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत,” असा दावा त्यांनी केला. महापौरपदासाठी सुरू असलेल्या या राजकीय खेळीमुळे मुंबई महापालिकेचा कारभार आणि सत्ता संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
___








