Reservation of mayor : महापौरपदाची आरक्षण सोडत गुरुवारी !

Possibility of changing the rotation method, accelerating political movements : रोटेशन पद्धत बदलण्याची शक्यता, राजकीय हालचालींना वेग

Mumbai : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर आता महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरविकास विभागाकडून ही सोडत मंत्रालयात सकाळी ११ वाजता काढली जाणार असून, कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर विराजमान होणार हे त्या दिवशी निश्चित होणार आहे.

नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत राज्यमंत्री (नगरविकास) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात, सहाव्या मजल्यावर ही प्रक्रिया पार पडणार असून, सकाळी ११ वाजल्यापासून सोडतीला सुरुवात होणार आहे. या सोडतीमुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता मंत्रालयाकडे लागले आहे.

BMC Mayor 2026 : महापौर कोणाचा ठरणार हे भाजप आणि अदानी ठरवतील

दरम्यान, महापौर आरक्षणाच्या सोडत प्रक्रियेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौरपदाच्या आरक्षणासाठी वापरली जाणारी रोटेशन किंवा चक्राकार पद्धत बदलण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नव्या नियमांनुसार आरक्षणाची चक्राकार प्रक्रिया पुन्हा ‘ओपन’ प्रवर्गापासून सुरू केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि ओबीसी प्रवर्गांसाठी रोटेशन पद्धतीने आरक्षण निश्चित केले जात होते. मात्र, नियमांमध्ये संभाव्य बदल झाल्यास ही प्रक्रिया नव्याने सुरू होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम अनेक महानगरपालिकांतील सत्तासमीकरणांवर होणार आहे.

महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यामागचा उद्देश समाजातील सर्व घटकांना या सर्वोच्च पदाची संधी मिळावी, हा आहे. त्यामुळे आरक्षणाच्या नव्या मांडणीबाबत अंतिम निर्णय काय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष आहे. २२ जानेवारीच्या सोडतीनंतरच या सर्व शक्यतांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

Weather update : राज्यात थंडीचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ – उत्तर महाराष्ट्रात शीतलहरीचा इशारा

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत आपली ताकद दाखवून दिली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मुंबईसह राज्यातील तब्बल १९ महानगरपालिकांमध्ये भाजपने विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का देत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, नागपूरमध्येही भाजपचा गड अबाधित राहिला आहे. तसेच संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या वर्चस्वाला शह देत भाजपने सत्ता खेचून आणली आहे.

या पार्श्वभूमीवर महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, २२ जानेवारीनंतर राज्यातील अनेक महानगरपालिकांमधील सत्ताकेंद्रे आणि नेतृत्व स्पष्ट होणार आहे.

___