The Prime Minister interacted with the beneficiaries in Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद
Nagpur ‘रोशनजी नमस्कार…रोशनजी बोला…’ अशी मराठीतून आपुलकीची साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून ऐकली. आणि सभागृहात उपस्थित सारेच थबकले. एकतर पंतप्रधानांचा आवाज आणि दुसरं म्हणजे मराठीतून संवाद. असा आश्चर्याचा सुखद धक्का नागपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बसला.
नागपूर जिल्ह्यातील सामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. देशभरातील सामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी शनिवारी, दि. २८ जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रातिनिधीक संवाद साधला. यात महाराष्ट्रातून नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मौजा मल्हापूर, गट ग्रामपंचायत धापरला(डोये) येथील रोशन संभाजी पाटील यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवादाची सुरुवातच मराठीतून केली. पाटील यांना स्वामित्व योजनेचा मिळालेला लाभ. शासनाची मदत. त्याचा झालेला फायदा. याविषयीची माहिती नरेंद्र मोदी यांनी सुमारे पाच मिनिटांच्या संवादातून जाणून घेतली. संवादादरम्यान लाभार्थी रोशन पाटील यांच्या शर्विल या मुलाचा वाढदिवस असल्याचे मोदींना कळले. ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. कुटुंबीयात असलेल्या सदस्यांची संख्या, स्वतः काय करता याचीही आस्थेवाईकपणे त्यांनी विचारपूस केली.
स्वामीत्व योजनेतून कसा फायदा झाला, बँकेचे कर्ज, आताची स्थिती याची माहिती आदींबाबत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना दिली. बँकेकडून नऊ लाख रुपयांचे कर्ज घेतले. काही पैसे घराला तर काही पैसे शेतीला लावले. शेतीतून फायदा होत असल्याचे सांगितले. बँकेकडून कर्ज घेण्यात पूर्वी अडचण यायची. स्वामित्व योजनेमुळे कर्ज मिळणे सुकर झाले आहे, असे पाटील यांनी पंतप्रधानांना सांगितले.
केंद्र सरकारच्या कुठल्या योजनांचा लाभ मिळाला आहे, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी विचारला. त्यावर उज्वला गॅस योजना, पीएम सन्मान निधी योजना, पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वामित्व योजनेचा लाभ दिल्याबद्दल पाटील यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.