Opposition unity against BJP appears likely : सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग; भाजपविरोधी मोर्चेबांधणीची शक्यता
Akola महानगरपालिकेत ३८ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला ४१ चा आकडा गाठण्यात अपयश आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपविरोधी सर्वच पक्ष एकत्र येण्याची शक्यता यामुळे बळावली आहे.
या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बंद दाराआड महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला एमआयएम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे नेतेही उपस्थित होते. विशेष म्हणजे, २१ नगरसेवक असलेल्या काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी मोठी राजकीय तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे. आम्हाला सत्तेत कोणतेही पद नको, मात्र भाजपेतर सत्ता स्थापन व्हावी, असा स्पष्ट प्रस्ताव काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह इतर मित्रपक्षांसमोर ठेवला आहे. या संभाव्य मोर्चेबांधणीमुळे अकोल्यात भाजपची सत्तास्थापना कठीण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Mahayuti Government : जलसिंचनाचा खेळखंडोबा; २१०० कोटी पाण्यात!
८० सदस्यीय अकोला महानगरपालिकेत बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता असताना कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आले आहेत. भाजपकडे ३८ जागा असल्या तरी बहुमतापासून रोखण्यासाठी काँग्रेसने सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत. आमदार साजिद खान पठाण यांनी प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल ४५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. पाच नगरसेवक असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसने ठाम भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Sudhir Mungantiwar : रामकथा म्हणजे रामधर्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अभूतपूर्व उत्सव
दरम्यान, भाजपने सत्ता स्थापनेसाठी सहा नगरसेवक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाही आधीच ‘ऑफर’ दिल्याची चर्चा आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही ठाकरे गटासमोर मोठा राजकीय प्रस्ताव मांडला आहे. २१ जागांची ताकद असलेली काँग्रेस आता प्रकाश आंबेडकरांच्या साथीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट अखेर कुणाची साथ देणार, यावर अकोला महापालिकेतील सत्तेचे भवितव्य ठरणार आहे.








