Akola Municipal Corporation : भाजपच्या गळाला शरद पवारांचे तीन नगरसेवक, ४४ जणांचा गट स्थापन

Sharad Pawar’s three corporators fall into BJP’s fold; strength rises to 44 : विरोधी आघाडीला जबर धक्का, महापौरपदासाठी महिला उमेदवार; घोषणा लवकरच

Akola महानगरपालिकेतील सत्तेसाठी सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने निर्णायक पाऊल टाकले आहे. युतीतील दोन मित्रपक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवदसेना शिंदे गटाच्या एका नगरसेविकेला सोबत घेत, ‘शहर सुधार आघाडी’ या नावाने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन करण्याची प्रक्रिया भाजपने पूर्ण केल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोला महानगरपालिकेत महापौर भाजपचाच होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

महापालिकेच्या ८० नगरसेवकांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र ३८ नगरसेवकांसह भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. निकालाच्या दिवसापासूनच सत्तास्थापनेसाठी भाजपने पुढाकार घेत विविध पक्षांच्या नगरसेवकांशी संवाद साधला होता.

विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तीन नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाची एक नगरसेविका, भाजपसोबत निवडणूक लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची एक नगरसेविका तसेच महानगर विकास समितीच्या एका नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील गटाचे संख्याबळ ४४ वर पोहोचले असून, गट स्थापनेची अधिकृत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालीच महापालिकेत सत्ता स्थापन होणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

Akola Municipal Corporation Election : महानगरपालिकेत सत्तेसाठी भाजपविरोधी आघाडीची रणनीती

काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एमआयएमकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. त्यामधून कोणतीही ठोस फलनिष्पत्ती निघाली नाही. विरोधकांच्या बैठकींचे सत्र सुरू असतानाच भाजपने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन करून त्यांच्या आघाडीला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपसोबत गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केलेल्या काही नगरसेवकांनी यापूर्वी विरोधकांच्या बैठकींनाही उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

भाजपकडे स्पष्ट बहुमत झाल्याने अकोला महानगरपालिकेचा नववा महापौर भाजपचाच होणार आहे. महापौरपदासाठी महिला उमेदवाराच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

Amravati APMC dissolved : अमरावती बाजार समिती बरखास्त; प्रशासक मंडळ नियुक्त

सध्या भाजपकडे १३ ओबीसी महिला नगरसेविका असून, त्यामधूनच एका उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. महापौरपदासाठी रश्मी प्रशांत अवचार, वैशाली विलास शेळके, पल्लवी मोरे, माधुरी क्षीरसागर, कल्पना गोटफोडे आणि मंजुषा शेळके यांची नावे चर्चेत असल्याचे समजते. अंतिम निवड कोणाच्या नावावर होते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.