Why all important posts in Worli Direct question from Shivsainik : ‘सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का?’ शिवसैनिकांचा थेट सवाल
Mumbai : एकीकडे कल्याण–डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का बसत असताना, आता मुंबईतही अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक संपताच ठाकरे गटातील गटबाजी, असंतोष आणि नेतृत्वाविषयीचे प्रश्न उघडपणे समोर येऊ लागले आहेत. पक्षातील सर्व महत्त्वाची पदे केवळ वरळी विधानसभेतील नेत्यांनाच का दिली जातात, असा थेट सवाल आता नाराज शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले असून भाजपनंतर ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र या यशानंतरही पक्षांतर्गत समाधानाऐवजी अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांची गट नोंदणी करताना पुन्हा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेच गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Shiv Sena symbol : “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” शिवसेना पक्ष–चिन्ह प्रकरणावर पुन्हा आक्षेप
किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपद बहाल केल्यापासून पक्षांतर्गत तीव्र कुजबूज सुरू झाली आहे. ज्येष्ठ, अनुभवी आणि निवडून आलेल्या अनेक मातब्बर नगरसेवकांना डावलून पुन्हा एकाच व्यक्तीवर विश्वास दाखवण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात किशोरी पेडणेकर यांच्यावर झालेले आरोप आणि त्यानंतर निर्माण झालेला वाद अजूनही शिवसैनिक विसरलेले नाहीत, असे बोलले जात आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ओळख आक्रमक आणि तडफदार नेते म्हणून असली, तरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर काही काळ त्या पक्ष सोडतील, अशी चर्चा देखील रंगली होती. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत साशंकता होती. एबी फॉर्मसाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागली होती आणि प्रभागातही त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटत असतानाही अखेर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.
Chandrapur Congress : चंद्रपूरात काँग्रेसची अवस्था, ‘आधे उधर जावो, आधे इधर आओ’
निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा किशोरी पेडणेकर यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवल्याने नाराजी अधिक तीव्र झाली आहे. यंदा ठाकरे गटाकडून मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव यांसारखी अनेक अनुभवी आणि प्रभावी मंडळी निवडून आली आहेत. तरीही या सगळ्यांना बाजूला ठेवून गटनेतेपद पुन्हा पेडणेकर यांनाच देण्यात आल्याने ‘निवडणूक जिंकूनही संधी नाही का?’ असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
वरळी विधानसभा मतदारसंघात आधीच विधान परिषदेतील दोन आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक अशी मोठी फौज आहे. त्यामुळे ठाकरे गटातील बहुतांश महत्त्वाची पदे ही वरळी विधानसभेकडेच केंद्रीत का आहेत, असा प्रश्न मुंबईतील इतर विभागांतील शिवसैनिक विचारू लागले आहेत. ‘मुंबई म्हणजे फक्त वरळीच आहे का?’ अशी संतप्त प्रतिक्रिया आता उघडपणे उमटू लागली आहे.
ZP Election : मोठी उलथापालथ : ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, दोन्ही राष्ट्रवादीचीही साथ !
एकीकडे पक्ष टिकवण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी संघर्षाची भाषा केली जात असताना, दुसरीकडे अंतर्गत नाराजी, संधींचे असमान वाटप आणि नेतृत्वावरचे प्रश्न ठाकरे गटासमोर गंभीर आव्हान ठरत आहेत. कल्याण – डोंबिवलीतील धक्क्यानंतर आता मुंबईतही असंतोष वाढत असल्याचे संकेत मिळत असून ही नाराजी उद्धव ठाकरे कशी शांत करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
___








