Uddhav Balasaheb Thackeray : ‘डिमोशन’मुळे प्रमोद मानमोडे नाराज, तर किशोर कुमेरियांकडे नागपूरची एकहाती सूत्रे

Party action: district chief ousted, rebel city chief expelled : नागपूर महापालिकेतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंचा चाबूक

Nagpur नागपूर महानगरपालिका निवडणुकीत अवघ्या दोन जागांवर आटोपलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने आता संघटनेत मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील नामुष्कीजनक पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या नेतृत्वात मोठे फेरबदल करत निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची गच्छंती केली आहे. जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांचे कट्टर विरोधक किशोर कुमेरिया यांच्याकडे आता संपूर्ण नागपूर शहराची ‘महानगरप्रमुख’ म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर उद्धव सेनेत सुरू असलेल्या ‘दोन जिल्हाप्रमुख आणि तीन शहरप्रमुख’ या प्रयोगाचा फज्जा उडाल्याने पक्षनेतृत्वाने आता ‘एकच नेता’ हे धोरण स्वीकारले आहे. जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्या विरोधात महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणारे शहरप्रमुख नितीन तिवारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तिवारी हे शिंदे गटात गेलेले माजी संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांचे समर्थक मानले जात होते.

निष्क्रियतेचा ठपका ठेवत प्रमोद मानमोडे यांना शहराच्या राजकारणातून बाहेर काढून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख करण्यात आले आहे. शहरातून थेट ग्रामीण भागात बदली झाल्याने मानमोडे आता पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सतत पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या किशोर कुमेरिया यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. दोन जिल्हाप्रमुखांच्या वादामुळे निवडणुकीत जो गोंधळ झाला, तो टाळण्यासाठी कुमेरिया यांना आता ‘महानगरप्रमुख’ करून समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी मानमोडे आणि कुमेरिया यांच्यात दक्षिण नागपूर मतदारसंघावरून आणि उमेदवारी अर्जावरून तीव्र संघर्ष झाला होता, ज्याचा मोठा फटका पक्षाला निवडणुकीत बसला.

पक्षाने शहराच्या कार्यकारणीतही मोठे फेरबदल करत जुन्या आणि वादग्रस्त नेत्यांना डच्चू दिला आहे. नव्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे आहेत:
महानगरप्रमुख: किशोर कुमेरिया
शहर प्रमुख: संदीप रियाल पटेल (मध्य व पश्चिम), हरिभाऊ बानाईत (पूर्व, उत्तर), विक्रम राठोड (दक्षिण, दक्षिण-पश्चिम).
उपशहरप्रमुख: महेंद्र कठाणे, शंकर थूल, राजू दलवी, पंकज अहिरराव, निखिल जाजुलवार आणि अभिषेक देशमुख.
विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये गेलेले दीपक कापसे आणि प्रविण बरडे यांना नव्या कार्यकारणीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

महापालिकेत केवळ दोन नगरसेवक निवडून आल्याने उद्धव सेनेची ताकद नागपुरात नगण्य झाली आहे. अशा स्थितीत नव्या टीमला सोबत घेऊन किशोर कुमेरिया पक्षाचे अस्तित्व पुन्हा कसे निर्माण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गटबाजी संपवून पक्ष बांधणी करणे हे नव्या कार्यकारणीसमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.