Local body elections : वाद टाळा, समजून घ्या; महायुतीचा एकोपा महत्त्वाचा

 

Ajit Pawar’s clear call to BJP in the backdrop of elections : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची भाजपला स्पष्ट साद

Pune: केंद्र आणि राज्यात एकत्रितपणे सत्ता चालवत असताना स्थानिक पातळीवर वाद निर्माण होणे टाळले पाहिजे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. बारामती आणि माळेगावमध्ये चांगल्या हेतूने बेरजेचे राजकारण करण्यात आले असून, अनावश्यक गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २७ जानेवारी ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख असल्याने, ज्यांचे शब्द ऐकले जातात त्यांच्यामार्फत नाराज कार्यकर्त्यांना समजावून सांगावे, अशी थेट साद अजित पवार यांनी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजपला घातली आहे.

कन्हेरी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या सभेत ते बोलत होते. भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात १५ उमेदवार उतरविल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ही भूमिका मांडली. सध्या काही ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू असून, अजित पवारांना १८ उमेदवार मिळाले नाहीत, अशा अफवाही जाणीवपूर्वक पसरविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Gulabrao Patil : काम आहे, पण मानसिकता नाही; तरुणांना राग आला तर आला !

पवार म्हणाले की, केंद्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचा भाग आहोत, तर राज्यात महायुती सरकारमध्ये एकत्र काम करत आहोत. अशा परिस्थितीत स्थानिक राजकारणामुळे तणाव निर्माण होणे योग्य नाही. माळेगावच्या निमित्ताने यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कमी लेखण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण त्यामुळे आम्हालाही स्वतंत्रपणे मैदानात उतरावे लागले, असे त्यांनी सांगितले.

समोरच्या काही सहकारी मित्रांनी दोन पंचायत समिती जागांची मागणी केली होती, तर उर्वरित पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात, अशी चर्चा झाली होती. मात्र एकमेकांना विरोध करून काहीही साध्य होणार नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे पवार यांनी ठामपणे नमूद केले.

Uddhav Balasaheb Thackeray : ‘डिमोशन’मुळे प्रमोद मानमोडे नाराज, तर किशोर कुमेरियांकडे नागपूरची एकहाती सूत्रे

 

इंदापूर तालुक्यातील परिस्थितीचा उल्लेख करताना अजित पवार म्हणाले की, वाद घालण्यापेक्षा दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आले तर बिघडले कुठे, असा प्रश्न उपस्थित करायला हवा. आम्ही भांडलो तर काही लोकांचे फावते, पण आम्ही एकत्र आलो की त्यांची किंमत राहत नाही. प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे आपणच घडवलेले कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते वाढले की पदे कमी पडतात, अपेक्षा वाढतात आणि त्यातून नाराजी निर्माण होते, हे राजकारणातील वास्तव असल्याचेही त्यांनी सांगितले.

महायुतीतील समन्वय, संवाद आणि परस्पर समजूत या माध्यमातूनच स्थानिक पातळीवरील वाद टाळता येतील, असा विश्वास व्यक्त करत अजित पवार यांनी एकत्र राहण्याचा संदेश या सभेतून दिला.

___