Uddhav Balasaheb Thackeray : रस्त्यासाठी टोकाचे आंदोलन! उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Shivsena leaders attempt self-immolation for road issue : वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने उचलेल पाऊल

Motala तालुक्यातील शेलापूर–सांगद शेतरस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे व गणेश घाटे यांनी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करून टोकाचे आंदोलन केले.

रस्त्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आंदोलनकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून तीव्र आंदोलन छेडले. या प्रकारामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच उपस्थित कर्मचारी व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या.

Republic Day Program : असे कसे सरकार? प्रजासत्ताक दिनालाच मंत्र्यांची पाठ!

दरम्यान, रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आंदोलनानंतर उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे यांनी सांगितले की, शेलापूर–सांगद शेतरस्ता खुला करण्याबाबत त्यांनी वेळोवेळी मोताळा तहसीलदारांकडे निवेदने सादर केली. तसेच महसूल विभागाने शेतरस्ते खुले करण्यासाठी राबविलेल्या विशेष पंधरवड्यातही या रस्त्याचा प्रश्न मांडण्यात आला होता. मात्र तहसीलदारांनी या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

Akola Mayoral Election : महापौरपदासाठी ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा; भाजपकडून शारदा खेडकर तर ठाकरेंकडून सुरेखा काळेंचे आव्हान!

“२५ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात एक महिन्यात रस्त्याचे काम न झाल्यास २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच आम्हाला आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागला. पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तो पूर्ण होऊ शकला नाही,” असे घाटे यांनी स्पष्ट केले.

रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात न आल्यास आता थेट महसूल मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.