Three days of mourning declared in the state : ‘शब्दाला पक्का’ लोकनेता काळाच्या पडद्याआड; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
Nagpur महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक कार्यपद्धतीने आणि प्रशासकीय वचकाने स्वतंत्र ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या सार्वजनिक जीवनातील एक झंझावात शांत झाला आहे. बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आज संपूर्ण महाराष्ट्रात अतीव दुःखाची लाट असून, राजकारण पलीकडचा एक सक्षम ‘प्रशासक’ हरपल्याची भावना जनसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. शासन स्तरावर २८ ते ३० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा राज्यस्तरीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, आज राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
अजितदादांच्या राजकीय प्रवासाचे विश्लेषण करताना त्यांचा प्रशासनावरील दरारा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला. पहाटे ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करून फाईल्सचा त्वरित निपटारा करण्याची त्यांची शैली मंत्रालयातील अधिकाऱ्यांपासून ते ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच थक्क करणारी होती. अकोल्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर akash fundkar यांनी व्यक्त केल्याप्रमाणे, दादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची हानी नसून ती महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेची मोठी हानी आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच राज्याच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली होती.
Ajit Pawar death news : २४ तासांत मदतीचा जीआर काढणारा लोकनेता हरवला!
अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असलेल्या अजित दादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ harshwardhan sapkal यांनी व्यक्त केल्या.
बुलढाण्यात सर्वपक्षीय ऐक्य
दादांच्या निधनाचे गांभीर्य ओळखून बुलढाणा जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत राजकीय मतभेद बाजूला ठेवले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मिळून आज ‘बुलढाणा जिल्हा बंद’ पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या काळात सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिले असून, कोणताही सार्वजनिक मनोरंजनाचा कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांचा ‘आधारवड’
विदर्भातील अतिवृष्टी असो वा सिंचन प्रकल्प, अजितदादांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. २४ तासांच्या आत मदतीचे शासन निर्णय (GR) काढण्याची त्यांची क्षमता ही त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक होती. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून, बारामतीसह संपूर्ण राज्यात त्यांच्या समर्थकांचा मोठा समुदाय शोकाकुल अवस्थेत आहे.








