Emotional tributes from Tatkare, Patel, Bhujbal : तटकरे, पटेल, भुजबळ यांची भावनिक श्रद्धांजली
mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक वरिष्ठ राजकीय नेतेच नव्हे, तर कार्यकर्त्यांसाठी कुटुंबप्रमुख, मार्गदर्शक आणि आधारस्तंभ हरपल्याची भावना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, अजितदादा पवार यांच्या निधनाने आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला आहे. त्यांचे आकस्मिक जाणे हे धक्कादायक आणि मन पिळवटून टाकणारे आहे. एक कुशल प्रशासक, अभ्यासू, रोखठोक आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने झटणारे नेतृत्व आपण गमावले आहे. दादांसोबतच्या प्रत्येक भेटीत शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांवर ठाम राहून काम करण्याचा आग्रह असायचा. शेतकरी, कष्टकरी आणि तळागाळातील सामान्य माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, ही त्यांची कायमची भूमिका होती, असेही तटकरे यांनी नमूद केले.
Ajit Pawar death news : २४ तासांत मदतीचा जीआर काढणारा लोकनेता हरवला!
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या शोकसंदेशात अजितदादांना ‘आधारस्तंभ’ संबोधले. त्यांनी म्हटले की, दादांचे निधन ही केवळ राजकीय नव्हे तर माझ्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील फार मोठी हानी आहे. राजकारणापलीकडे आमचे कौटुंबिक संबंध होते. दादा नेहमी आपुलकीने चौकशी करायचे, तब्येतीची काळजी घ्यायला सांगायचे. त्यांच्या निधनाने कठोर निर्णय घेणारे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व आपण गमावले आहे. जवळपास ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी अखंड लढा दिला, असेही पटेल यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादांच्या निधनावर तीव्र भावना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादांसारख्या उमद्या, हसतमुख आणि जिंदादिल व्यक्तीच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून विश्वासच बसत नाही. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. ‘कडक शिस्तीचे प्रशासक’ म्हणून ओळख असलेल्या अजितदादांनी अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तब्बल ११ वेळा मांडला आणि प्रशासकीय शिस्त, पायाभूत सुविधा व आर्थिक नियोजनावर ठसा उमटवला.
Ajit Pawar death news : अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
भुजबळ यांनी पुढे सांगितले की, बारामतीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली. पहाटेपासून कामाला लागणारा हा झंझावात लोकनेता शेवटच्या माणसाचा विचार करत होता. स्वभावाने रोखठोक असतानाही मनाने अतिशय स्वच्छ, आपुलकीचा आणि जिंदादिल असलेले व्यक्तिमत्व महाराष्ट्राने गमावले आहे. पत्रकारांशी संवाद असो वा सहकाऱ्यांशी वर्तन, दादांचा वावर नेहमीच चैतन्य निर्माण करणारा असायचा, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
अजितदादा पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला आहे. त्यांचे विचार, कार्य, प्रशासनातील ठाम भूमिका आणि सर्वसामान्य जनतेसाठीची तळमळ ही कायम प्रेरणादायी राहील, अशा भावना तटकरे, पटेल आणि भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. तिन्ही नेत्यांनी पवार कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
__








