BJP accused of losing public support in Akola : भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही; ‘शहर सुधार समिती’च्या नावाखाली केविलवाणा प्रयत्न
Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अकोल्यात भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटला असून, ही भाजपची स्पष्ट आणि नैतिक हार असल्याचा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव यांनी केला आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधी तसेच अकोल्यातील स्थानिक कारभाराविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे.
निलेश देव यांनी भाजपच्या सद्यस्थितीवर बोट ठेवताना म्हटले की, भाजपविरोधी वातावरणामुळे त्यांच्या तब्बल १० जागा कमी झाल्या आहेत. स्वतःच्या पक्षाच्या नावाखाली सत्ता स्थापन करणे भाजपला शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी ‘शहर सुधार समिती’ या नावाखाली आघाडी स्थापन करून महापौर आणि उपमहापौर निवडणुकीला सामोरे जाण्याचे पाऊल उचलले, असा दावा देव यांनी केला आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे शहरात विरोधकांची एकजूट निर्माण झाली असून, त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अकोला शहराचा कारभार हा संविधानानुसार आणि लोकशाही मूल्यांनुसार चालावा, यासाठी वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका ठामपणे मांडणार असल्याचे निलेश देव यांनी सांगितले. “महापालिकेत कोणतेही असंवैधानिक, अन्यायकारक किंवा लोकविरोधी निर्णय घेतल्यास वंचित बहुजन आघाडी सभागृहात तसेच सभागृहाबाहेर तीव्र संघर्ष करेल,” असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. जनतेचे हक्क आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असून, पारदर्शक प्रशासनासाठी पक्षाचा लढा अखंड सुरू राहील, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
Akola Mayoral Election : ४५ विरुद्ध ३२ : भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचा दणदणीत विजय
अकोला महापालिकेत सत्तास्थापनेच्या गणितांमध्ये भाजपने ‘शहर सुधार समिती’चा प्रयोग राबवल्याने विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. निलेश देव यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भाजप आणि विरोधी वंचित बहुजन आघाडी यांच्यात जोरदार कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.








