Anganwadi workers to get pending honorarium of 23 months : १५ व्या वित्त आयोगातून २३ महिन्यांचे थकीत मानधन देण्याचे आदेश
Buldhana कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून जनजागृती, सर्वेक्षण व आरोग्य विभागाची महत्त्वाची कामे करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या थकीत मानधनाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रति महिना एक हजार रुपयांप्रमाणे २३ महिन्यांचे थकीत मानधन १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
जिल्ह्यातील सुमारे ६,५०० अंगणवाडी सेविकांचे मानधन दीर्घकाळापासून प्रलंबित होते. कोरोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही मानधन न मिळाल्याने सेविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय आंदोलने झाली होती. तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनने आठ दिवसांत मानधन न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
Mahayuti government: विवरा शिवारातील शेतरस्त्याचा वाद पेटला; सरकारविरोधात ग्रामस्थ आक्रमक
या संदर्भात संघटनेच्या वतीने सुरेखा तळेकर, संगीता ठाकूर, अलका राऊत, नंदकिशोर गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन सादर केले होते. त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी थकीत मानधन अदा करण्याबाबत ठोस निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, नगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांना संबंधित नगरपालिकेच्या, तर ग्रामीण भागातील सेविकांना ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून थकीत रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी केवळ एका महिन्याचा भत्ता सेविकांना देण्यात आला होता. त्यानंतर ही प्रक्रिया ठप्प झाली होती. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर २३ महिन्यांच्या थकीत मानधनाचा मार्ग मोकळा झाल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.








