The ‘Invisible Alliance’ in the Mayoral Election Exposed : महापौर निवडणुकीतील ‘अदृश्य युती’ उघड
Akola महापौर व उपमहापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रशासक राजवटीनंतर पुन्हा एकदा महापालिकेतील सत्ता आपल्या ताब्यात घेतली. स्पष्ट बहुमत नसतानाही संख्याबळाचे गणित, युतीचे राजकारण आणि निर्णायक क्षणी घडलेली मतांची एकजूट याच्या जोरावर भाजपने दोन्ही पदांवर बाजी मारली. या सत्तास्थापनेत वैचारिक भूमिकेपेक्षा राजकीय सोयीस्करतेला प्राधान्य देण्यात आल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे.
सभागृहातील घडामोडींमध्ये ‘एआयएमआयएम’ने घेतलेली तथाकथित तटस्थ भूमिका भाजपप्रणित ‘शहर सुधार आघाडी’साठी निर्णायक ठरली. भाजपला थेट पाठिंबा न देता काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याने ही तटस्थता अप्रत्यक्षपणे भाजपच्या पथ्यावर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे महापौर निवडणुकीच्या दिवशी संपूर्ण राजकीय गणितच पालटले.
Local body elections : ५२५ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; लोकशाहीला तात्पुरता ब्रेक?
भाजप २०१७ ते २०२२ या कालावधीत महापालिकेत सत्तेत होता. त्यानंतर निवडणुका रखडल्याने आयुक्तांकडे प्रशासक म्हणून कारभार सुरू होता. दीर्घ कालावधीनंतर झालेल्या या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमतासाठी आवश्यक असलेला ४१ नगरसेवकांचा आकडा गाठता आला नाही. या राजकीय पोकळीत भाजपने संधी साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिंदेसेना आणि अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापन केली.
दुसरीकडे, काँग्रेसने भाजपविरोधी आघाडी उभारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यासोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीच्या आधीपर्यंत बहुमताचा दावा केला जात होता; मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी काँग्रेसची रणनीती कोलमडल्याचे स्पष्ट झाले.
तटस्थतेच्या आड काँग्रेसविरोधी डाव
‘एआयएमआयएम’च्या तीन नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरण निर्णायकरीत्या बदलले. भाजपला थेट साथ देण्याऐवजी काँग्रेसचे वर्चस्व रोखणे आणि दीर्घकालीन पक्षवाढीचा विचार या भूमिकेमागे असल्याची चर्चा आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसल्याचे चित्र समोर आले.
अपक्ष नगरसेवकाची ऐनवेळी पलटी
भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक आशीष पवित्रकार यांनी अखेर भाजप उमेदवारांना मतदान केले. वरिष्ठ नेत्यांचा सल्ला आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून त्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याचे सांगितले जाते. या बदललेल्या भूमिकेमुळे भाजपचा विजय अधिक सुकर झाला.
Sharad Pawar : अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, आज अजित असते तर फिल्डवरच दिसले असते
जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम?
महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिंदेसेनेला सोबत घेतले, तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेना एकत्र मैदानात उतरल्या होत्या. निवडणुकीनंतर तयार झालेले हे युती-आघाडीचे समीकरण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रंगीत तालीम ठरणार का, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








