Shiv Sena UBT vs BJP : ‘सत्तेसाठी MIM सोबत गळ्यात गळे घालणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये’

shivsena-ubt-rahul-karale-strong-rejoinder-to-bjp-on-hindutva-issue : भाजप शहराध्यक्षांवर घणाघाती हल्ला; अकोल्यात शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

Akola अकोल्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भारतीय जनता पक्षामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून खडाजंगी पाहायला मिळत आहे. “सत्तेसाठी मेहबूबा मुफ्ती, नितीशकुमार आणि अकोल्यात एमआयएम (MIM) सोबत गळ्यात गळे घालून सत्ता स्थापन करणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत, भाजपचे हिंदुत्व बेगडी आणि ढोंगी आहे,” अशा शब्दांत शिवसेना शहरप्रमुख राहुल कराळे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. आमदार नितीन देशमुख यांच्यावर भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देताना कराळे यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला.

आमदार नितीन देशमुख यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजप नेत्यांना कराळे यांनी सडेतोड सवाल केला की, आमदारांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बसावे की बीअर बारमध्ये निर्णय घ्यावेत? अकोल्यातील भाजपच्या नगरसेवक असलेल्या शहराध्यक्षांनी हे लक्षात ठेवावे की, नितीन देशमुख हे एका संपूर्ण विधानसभेचे लोकप्रतिनिधी आहेत. संघाच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना तिकीट देणाऱ्या आणि काँग्रेसची सत्ता उपभोगून भाजपमध्ये स्थिरावलेल्या नेत्यांनी शिवसेनेच्या राष्ट्रनिष्ठ हिंदुत्वावर बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

Amravati Municipal Corporation : अमरावतीत महायुतीचं ठरलं! चारही पक्षांना मिळणार संधी

भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या घोषणांवर टीका करताना कराळे म्हणाले की, भाजप केवळ जातीय तेढ निर्माण करून सत्तेची समीकरणे जुळवण्यात मग्न आहे. आमचे हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर आधारित असून ‘हृदयात राम आणि हाताला काम’ देणारे आहे. जनतेने भाजपचा हा ढोंगीपणा ओळखला आहे, म्हणूनच अकोल्यात भाजपचे संख्याबळ ४८ वरून ३८ वर आले आहे. जनतेला खुळे समजणे भाजपने बंद करावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या संघर्षामुळे अकोल्यातील स्थानिक राजकारण आता अधिक आक्रमक वळणावर पोहोचले आहे.