
Strong efforts by aspirants for the co-opted corporator posts : महापालिकेत ‘स्वीकृत’, स्थायी’साठी जोरदार मोर्चेबांधणी
Amravati अमरावती महापालिकेत महापौर व उपमहापौरांची निवडणूक शुक्रवार, दि. ६ रोजी पार पडली. मात्र आता स्वीकृत सदस्य आणि स्थायी समितीतील सदस्यत्वासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी संपलेली नसून, पराभूत उमेदवारांसह इच्छुकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये स्वीकृत सदस्यत्वासाठी सर्वाधिक चढाओढ असल्याची माहिती आहे. महापालिकेत ८ स्वीकृत, तर १६ स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत गटांच्या संख्येनुसार १० टक्क्यांच्या निकषावर स्वीकृत सदस्य निश्चित केले जातील. अमरावती महापालिकेत एकूण ८७ नगरसेवक निवडून आले आहेत. नगरविकास विभागाने २०२३ मध्ये नियमांमध्ये बदल केल्याने १० टक्के निकषानुसार स्वीकृत सदस्य नामनिर्देशित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेत ८ स्वीकृत नगरसेवक नामनिर्देशित होण्याची दाट शक्यता आहे.
Eknath Khadse : भोसरी जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना न्यायालयाचा दणका; अजामीनपात्र वॉरंट जारी
महापालिकेत भाजपचे २५, काँग्रेस १५, युवा स्वाभिमान १५, एमआयएम १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ११, शिंदेसेना ३, बसप ३, उद्धवसेना २ आणि वंचित बहुजन आघाडीचा १ नगरसेवक निवडून आला आहे. येत्या आठवड्यात स्वीकृत व स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित होण्याचे संकेत आहेत.
आता सभेचे पीठासीन सभापती असतील महापौर
महापौर व उपमहापौरांची निवडणूक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पीठासीनाखाली पार पडली. मात्र, यानंतर स्वीकृत सदस्य आणि स्थायी समिती सदस्यांच्या नामनिर्देशनासाठी होणाऱ्या सभेचे पीठासीन सभापती नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी असतील.
गटनेत्यांनी सादर केलेल्या नावांची संख्याबळानुसार छाननी करून महापौर तेजवानी हे स्वीकृत व स्थायी समिती सदस्यांची घोषणा करतील. बृहन्मुंबई महापालिका कायद्यानुसार हे अधिकार महापौरांना बहाल करण्यात आले आहेत.
स्थायी समितीत १६ सदस्यांची वर्णी
अमरावती महापालिकेतील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती १६ सदस्यांची असेल. पक्षीय संख्याबळानुसार नगरसेवकांना स्थायी समितीत प्रवेश मिळणार आहे. महापौर श्रीचंद तेजवानी हे स्थायी समिती सदस्यांची नावे घोषित करतील. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांकडून नेत्यांची मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे.
पाच सदस्यांमागे एक स्थायी समिती सदस्य महापालिकेच्या स्थायी समितीत गट नोंदणीनुसार पाच नगरसेवकांमागे एक स्थायी समिती सदस्य नियुक्त केला जाणार आहे. त्यानुसार भाजपचे ५, युवा स्वाभिमानचे ३, काँग्रेसचे ३, एमआयएमचे २, राष्ट्रवादी (अजित पवार)चे २ सदस्य स्थायी समितीत जाणार आहेत. १६ व्या सदस्यासाठी बसप आणि शिंदेसेना यांच्यात ईश्वरचिठ्ठी काढली जाण्याची शक्यता आहे. उद्धवसेना (२) आणि वंचित बहुजन आघाडी (१) यांची स्वतंत्र गट नोंदणी झालेली आहे.








