Clerk-of-Food-and-Drug-Administration-arrested-in- Mantralaya : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
Mumbai : राज्याच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला रंगेहात पकडले आहे. एसीबीने रचलेल्या सापळ्यात राजेंद्र ढेरंगे यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे मंत्रालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मेडिकल दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी संबंधित लिपिकाने सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे धाव घेतल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारताना ढेरंगे यांना दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कक्ष ताब्यात घेत तपास प्रक्रिया पूर्ण केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीचे सुमारे सहा अधिकारी संबंधित मंत्र्यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. आवश्यक तपास व पंचनामा पूर्ण केल्यानंतर आरोपी लिपिकाला अटक करण्यात आली. काही काळ कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले होते. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेवर हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रालयातच लाचखोरीचे प्रकार उघड होत असल्याने प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे भ्रष्टाचाराविरोधातील उपाययोजनांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून, एसीबीच्या कारवाईमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ माजली आहे. पुढील तपासातून या प्रकरणातील इतर बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








