chhatrapati-shivaji-maharaj-396th-jayanti-celebration-shivneri-akot-rangoli : शिवनेरीवर मुख्य कार्यक्रम अकोटमध्ये 30 हजार चौरस फुटांची रांगोळी
Mumbai: महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, अभिवादन सोहळे आणि शिवचरित्रावर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी येथे विशेष आकर्षक सजावट करण्यात आली असून पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक शिवजन्मभूमीवर नतमस्तक होत आहेत.
शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह पर्यटनमंत्री शंभुराज देसाई आणि सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांसारखे मान्यवरही कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. जन्मस्थळ परिसरात सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली असून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात शिवजयंतीनिमित्त एक अनोखा आणि भव्य उपक्रम साकारण्यात आला आहे. येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने तब्बल 30 हजार चौरस फुटांची रांगोळी साकारत शिवभक्तांचे लक्ष वेधले आहे. सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांची आकर्षक प्रतिमा या रांगोळीत उभी करण्यात आली आहे. अवघ्या 15 विद्यार्थ्यांनी सहा दिवसांच्या परिश्रमातून ही कलाकृती पूर्ण केली. सुमारे 40 क्विंटल रंगांचा वापर करून मैदानाची आखणी, रेखाटन आणि रंगभरणीची प्रक्रिया पार पडली. गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयात शिवजयंती निमित्त भव्य रांगोळी काढण्याची परंपरा कायम असून यंदा सलग तिसऱ्या वर्षी इतक्या मोठ्या आकाराची रांगोळी साकारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अकोट शहरात महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लातूर शहरातही मध्यरात्री शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराज चौकात रात्री बारा वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त मानसी मीना, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांच्या उपस्थितीत बाळ शिवबांचा पाळणा झुलवण्यात आला. तुताऱ्यांचा निनाद, फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर भारावून गेला. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.
Nagpur municipal corporation : बाल्या की बंटी?; परिवहन समितीचे ‘स्टिअरिंग’ कोणाच्या हाती?
भंडारा शहरात सायंकाळी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. शिवकालीन युद्धकला, दांडपट्टा आणि विविध शारीरिक कवायतींचे सादरीकरण करण्यात आले.
राज्यभरात पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचे पथक, शिवचरित्रावरील देखावे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी केली जात असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि स्वराज्याच्या संकल्पनेची उजळणी या निमित्ताने होत आहे.








