Dispute-between-corporators-complainants-before-the-Municipal-Commissioner : महापालिका आयुक्तांसमक्ष नगरसेवक व तक्रारदारांमध्ये वाद
Amravati अमरावती महापालिकेच्या वतीने आयोजित ‘जनसंवाद’ उपक्रमांतर्गत तक्रार व समस्या निवारण कार्यक्रमादरम्यान तक्रारदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा प्रकार महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या समक्ष घडल्याने कार्यक्रमात एकच खळबळ उडाली.
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांच्या तक्रारींची सुनावणी सुरू होती. विविध समस्या घेऊन नागरिक उपस्थित होते. याच दरम्यान गणेश मानकर या तक्रारदाराने परिसरातील अतिक्रमणाबाबत तक्रार दाखल केली.
तक्रार सादर होत असताना प्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नगरसेवक चंदू खेडकर हेही आयुक्तांसमोर उपस्थित होते. अतिक्रमणाच्या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली. मात्र, याच मुद्द्यावरून तक्रारदार आणि नगरसेवकांमध्ये वादाला तोंड फुटले.
BJP state body : भाजपने साधला विदर्भातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये बॅलन्स
वाद वाढत गेल्याने दोघांमध्ये ‘तू-तू, मैं-मैं’ सुरू झाली. यावेळी नगरसेवकांनी अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप असून, यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
परिसरातील अतिक्रमणाबाबत आयुक्तांचे लक्ष वेधताना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, ही बाब तक्रारदाराला मान्य नसल्याने क्षुल्लक वाद निर्माण झाला, असे नगरसेवक चंदू खेडकर यांचे म्हणणे आहे.
तर आयुक्तांनी सभागृहात झालेल्या वादाशी प्रशासनाचा कोणताही संबंध नाही. संबंधित दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याची मला माहिती नाही. प्राप्त तक्रारींची शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे म्हटले आहे.








