bacchu kadu clearifies his connection regarding ashok kharat video viral : भोंदूबाबा प्रकरणात भाजप कार्यालयातून बदनामीच्या कटाचा आरोप
Amravati महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नाव जोडले गेल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, भाजप कार्यालयातून बदनामीचा कट रचला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
कडू यांनी स्पष्ट केले की, “आम्ही अशा भोंदू प्रवृत्तीचा निषेधच करतो. मात्र, एखाद्या व्यक्तीसोबत फोटो किंवा व्हिडिओ असणे म्हणजे तो आरोपी ठरत नाही.” त्यांनी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो दाखवत थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Ashok kharat case : कस्तुरी, जडीबुटी आणि बनावट रत्न खरेदीचा संशय
यावेळी कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख करत भाजपला प्रश्न विचारला. “मोदीसुद्धा आसाराम बापूंना भेटले होते. मग त्यांचाही राजीनामा मागणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, अशोक खरात आणि बच्चू कडू यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी कडू यांनी पत्रकार परिषद घेतली.
या संदर्भात कडू म्हणाले की, “कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही एका मंदिरात गेलो होतो. त्या ठिकाणी संबंधित व्यक्ती उपस्थित होती. भारतीय संस्कृतीनुसार वयाने मोठे असल्याने मी त्यांच्या पाया पडलो. मात्र, त्यांच्या कृतींचे आम्ही समर्थन करत नाही.”
Rupali chakankar : पक्षाची बदनामी टाळण्यासाठी महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही राजीनाम्याची मागणी
भाजपवर हल्लाबोल
कडू यांनी पुढे आरोप केला की, “अशोक खरातला भेटायला अनेक मोठे नेते गेले होते. अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना कोणी जाब विचारतो का? भाजप ठरवते कोणाला बदनाम करायचे. मी गरीब असल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.








