Breaking

Kirit Somaiya : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रावरून काँग्रेस- भाजप आमने सामने

Politics on Birth and death certificate case : सोमय्यांच्या आरोपावर काँग्रेस आमदाराची टीका, प्रमाणपत्रांची होणार ‘एसआयटी’ चौकशी

Akola अमरावती पाठोपाठ आता अकोला जिल्ह्यातील जन्म मृत्यू प्रमाणपत्रावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. सोमय्यांच्या या आरोपावर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी टीका करताना सोमय्या यांचा हा सरकारला घरचा आहेर असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, त्यापूर्वीच राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची एस आणि टी चौकशी करण्याच्या आदेश दिले आहेत.

जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेसंदर्भात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून राज्य शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची चौकशी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथक (‘एसआयटी’) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २१ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार, अकोला जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या १०,२७३ जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

Mahayuti Government: जिल्ह्यातील शक्तीस्थळे ओळखून विकास आराखडा तयार होणार

जन्म व मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. एक वर्षाहून अधिक कालावधीनंतर ज्या प्रकरणांची नोंदणी होत नाही, अशा उशिरा नोंदणीसाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. गृह विभागाने १० सप्टेंबर २०२३ रोजी अधिसूचना जारी करून अकोला जिल्ह्यातील तहसीलदारांना उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरणाचे अधिकार दिले होते. तथापि, या प्रक्रियेसंदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्यामुळे चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे.

सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये तहसीलदारांनी १०,२७३ प्रमाणपत्रे वितरित केली. याशिवाय, १५,८४५ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १०७ अर्ज नामंजूर आणि ४,८४४ अर्ज प्रलंबित आहेत. ‘एसआयटी’मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. यासोबतच, पुढील आदेशापर्यंत उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

किरीट सोमय्यांचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २२ जानेवारी रोजी समाजमाध्यमाच्या ‘एक्स हँडल’वर दावा केला की, अकोला जिल्ह्यात १५,८४५ बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. हा आरोप चौकशीसाठी आणखी एक गंभीर मुद्दा ठरत आहे. प्रशासनाने या आरोपांचीही तपासणी करणे आवश्यक आहे.

Local body elections: नागपुरातून येणाऱ्या लिफाफ्यात कुणाचे नाव?

घुसखोरी करणाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण नाही – काँग्रेस

भाजपा नेते किरीट सोमय्या हे एक जबाबदार नेते असून मागील काही काळात त्यांनी देशातील अनेक नेत्यांचे कारनामे बाहेर काढीत त्यांच्यामागे चौकश्या लावल्या होत्या. ते सत्तपक्षाचे नेते आहेत. आज मोठ्या आनंदाची बाब आहे की ते सरकारमध्ये असून या सरकारवरच आरोप लावतात की या सरकारच्या काळात बांगलादेशी, रोहिंग्या हे देशात घुसले आहेत. आणि आता तर त्यांच्या म्हणण्यानुसार अकोल्यात सुद्धा १५ हजारच्या वर बांगलादेशी आहेत. त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा व्हायला पाहिजे. मी याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधून चर्चा केली आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. घुसखोरी करणाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण नसून याबाबतीत भाजपा सरकार असमर्थ ठरली आहे. ही बाब गंभीर असून याची चौकशी व्हावी, काँग्रेस आमदा साजिद खान पठाण यांनी म्हटले आहे.