व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Hanuman jayanti : हनुमान जयंतीनिमित्त माकडांची शिस्तबद्ध पंगत, भक्ती आणि भूतदयाचा संगम

Hanuman jayanti : हनुमान जयंतीनिमित्त माकडांची शिस्तबद्ध पंगत, भक्ती आणि भूतदयाचा संगम

hanuman-jayanti-2026-akola-kothali-bujuruk-monkey-feast-unique-tradition : अकोल्याच्या कोथळी बुजरूक गावात अनोखी परंपरा

Akola : देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह साजरा होत असताना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी बुजरूक गावाने एक अनोखी आणि हृदयस्पर्शी परंपरा जपली आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त येथे दरवर्षी माकडांसाठी विशेष पंगत आयोजित केली जाते. यंदाही या पंगतीत माकडांनी शिस्तीत एका रांगेत बसून आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांवर ताव मारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हनुमान, मारुती, बजरंगबली आणि अंजनीसूत अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शक्तीच्या देवतेचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. याच पवित्र दिनाचे औचित्य साधत कोथळी बुजरूक गावात गेल्या दोन दशकांपासून ही अनोखी परंपरा सुरू आहे. गावाजवळील घनदाट जंगलात वसलेल्या मुंगसाजी महाराज संस्थान मंदिर परिसरात हा उपक्रम दरवर्षी पार पडतो.

Road in bad condition : निकृष्ट रस्त्यांच्या ‘शांती’साठी नागरिकांकडून ‘होम-हवन’!

या परंपरेला रामदास महाराज शिंदे यांनी सुरुवात केली असून त्यांच्या पुढाकारातून ही पंगत आजही कायम ठेवली जाते. माकडांसाठी खास तयार केलेल्या या पंगतीत चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिट्ट्या तसेच विविध मिष्टान्न पदार्थ वाढले जातात. विशेष म्हणजे माकडंही शांतपणे आणि शिस्तीत बसून या भोजनाचा आस्वाद घेतात, जे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

रामनवमीपासून ते हनुमान जयंतीपर्यंत पंचक्रोशीतील भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर आणि येथे अनुभवायला मिळणारी ही परंपरा भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. माणूस आणि प्राणी यांच्यातील सहअस्तित्वाचा संदेश देणारा हा उपक्रम भक्तीबरोबरच भूतदयाचाही सुंदर संगम दाखवतो.

Amravati congress : पद ‘नाममात्र’ असल्याचे सांगत काँग्रेस नेत्याचा राजीनामा

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथेही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या सुमारे १०५ फूट उंच हनुमान मूर्तीला सूर्योदयाच्या वेळी जलाभिषेक करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळपासूनच भाविकांनी येथे मोठी गर्दी केली आहे. हनुमान जयंतीनिमित्त राज्यभरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असताना अकोल्यातील या अनोख्या परंपरेची सर्वत्र चर्चा होत आहे.

error: Content is protected !!