Navneet Rana upset over exclusion from the list of star campaigners for the Assembly elections : निशाणा कोणावर?; विधानसभा निवडणुकांतील स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव गायब झाल्याचा परिणाम
Amravati अमरावतीच्या राजकारणात माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका शायरीमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. “कहते हैं ना, आपको हम जैसे हजारों मिलेंगे, पर उन हजारों में हम नहीं मिलेंगे,” असा शेर त्यांनी शेअर करत त्याखाली “ये उन लोगों के लिए है, समझदार को इशारा काफी है,” अशी टिपणी केली आहे. या पोस्टमुळे त्यांच्या या संदेशाचा नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत नवनीत राणा यांच्या राजकीय प्रवासात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राज्यसभेची संधी हुकल्याची चर्चा अद्याप शांत झालेली नसतानाच विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नाव गायब राहिल्यानेही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर आलेली त्यांची ही पोस्ट केवळ भावनिक अभिव्यक्ती नसून, त्यामागे राजकीय संदेश दडल्याचे मानले जात आहे.
Akola Municipal Corporation : मालमत्ता करात घंटागाडीचे वार्षिक ६०० रुपये; विरोधकांनी सभागृह सोडले
राणांचा हा सूचक इशारा नेमका दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना आहे, की राज्यातील प्रभावशाली नेत्यांना, याबाबत अमरावतीत जोरदार चर्चा रंगली आहे. समर्थकांकडून या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत असताना विरोधकही त्याचा अर्थ शोधण्यात गुंतले आहेत. राजकीय संदेश देण्यासाठी शायरीचा वापर करण्याची परंपरा नवीन नाही; मात्र राणांच्या या ‘शेर’ने अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे. आता त्यांच्या या संदेशाचा पुढचा अध्याय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








