bjp-vidhanparishad-candidates-maharashtra-regional-balance-new-faces : निवृत्त आमदारांना डावलले, विधानपरिषदेसाठी सहा उमेदवारांची घोषणा
Mumbai: महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सहा उमेदवारांची अधिकृत घोषणा करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे. या उमेदवारीत भाजपने प्रादेशिक संतुलन साधण्याचा प्रयत्न करताना बहुतांश ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, कार्यकाळ संपत असलेल्या विद्यमान आमदारांना यावेळी उमेदवारी नाकारत पक्षाने संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांना प्राधान्य दिले आहे.
भाजपने जाहीर केलेल्या यादीत मराठवाड्यातून सुनील कर्जतकर, कोकणातून प्रमोद जठार आणि माधवी नाईक, विदर्भातून संजय भेंडे, तर उत्तर महाराष्ट्रातून विवेक कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडीमधून विविध विभागांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न दिसून येतो, मात्र मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राला या यादीत स्थान मिळालेले नाही.
Sanjay Gaikwad controversy : संजय गायकवाड यांच्या विरोधातील आंदोलनामुळे बुलढाण्यात तणाव
यावेळी भाजपने संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांसारख्या निवृत्त आमदारांना उमेदवारी नाकारत मोठा राजकीय संदेश दिला आहे. पक्षाने नव्या नेतृत्वाला संधी देत संघटनात्मक कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांची उमेदवारी विशेष चर्चेत आहे. कोल्हे परिवाराचा नगर जिल्ह्यात प्रभाव मानला जातो. विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आहेत. कोपरगाव परिसरातील राजकीय समीकरणे लक्षात घेता त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचीही चर्चा होती.
Sanjay Nirupam : मीरा भाईंदरची घटना दहशतवादी कृत्यासारखीच, यामागे ‘मास्टरमाइंड’ असण्याची शक्यता
नागपूरमधील संजय भेंडे यांनाही भाजपने संधी देत त्यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याची दखल घेतली आहे. ते सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असून यापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणूक व्यवस्थापनात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. सहकार क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
कोकणातील प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांची निवडही लक्षवेधी ठरली आहे. कोकणात भाजपला अधिक बळ देण्याच्या दृष्टीने ही रणनीती आखल्याचे मानले जात आहे. विशेषतः कोकणावर अन्याय झाल्याची भावना दूर करण्यासाठी पक्षाने या भागाला दुहेरी प्रतिनिधित्व दिल्याचे दिसून येते.
Samrt city project : मृतांच्या हक्काची जागाही सोडली नाही; दहनघाटच केला लंपास
दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देत भाजपने राजकीय संदेश दिला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना संधी देत आपला विस्तार वाढवण्याची रणनीती पक्षाने कायम ठेवली आहे.
एकूणच भाजपच्या या उमेदवारी यादीत प्रादेशिक संतुलन, संघटनात्मक कार्यकर्त्यांना प्राधान्य आणि नव्या नेतृत्वाला संधी या तीन प्रमुख बाबींवर भर देण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत या निर्णयांचा राजकीय परिणाम काय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








