Mahavikas Aghadi will contest the local body elections together : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार
Buldhana : महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका जिल्ह्यात एकदिलाने लढली. मात्र महायुतीने राजकीय षडयंत्रे वापरुन विजय संपादन केला. महायुतीच्या हुकुमशाहीविरुध्द मविआने लोकशाहीचा जागर केला. यापुढेही लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवूनच मविआ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.
बुधवारी २२ जानेवारी रोजी स्थानिक अनुराधा अभियंत्रिकी महाविद्यालय येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करून करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. बैठकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जाण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उबाठा शिवसेना या तीन्ही पक्षांची व्रजमुठ कायम राखण्यासाठी समन्वयक पदाची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी दिली. याप्रसंगी आमदार राहुल बोंद्रे, उबाठा शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार धिरज लिंगाडे, आमदार सिध्दार्थ खरात, दिलीपकुमार सानंदा, राजेश एकडे, श्याम उमाळकर, जालींदर बुधवत, प्रसेनजीत पाटील, वसंतराव भोजने, नरेश शेळके, स्वातीताई वाकेकर, जयश्री शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
उबाठा शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत राज्यात मविआला चांगले यश मिळाले. हाच आलेख विधानसभेतही कायम असायला हवा होता. मात्र महायुतीने तत्वे निष्ठा पायदळी तुडवून यश मिळविले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मविआने कंबर कसली असून विजय आपलाच आहे.
सदर बैठकीत विविध द्येय धोरणांसंदर्भात ठराव मंजूर करण्यात आले. यावेळेस मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिध्दार्थ खरात यांचा महाविकास आघाडीच्यावतीने फेटा, शाल, पुष्पगुच्छ देत यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी लक्ष्मणराव घुमरे, अॅड. साहेबराव सरदार, छगन मेहेत्रे, संदिप शेळके, डी. एस. लहाने, हाजी रशीद खा जमादार, प्रकाश पाटील, हाजी दादु सेठ, रियाज खा. पठाण, पांडुरंग पाटील, दिलीप जाधव, संतोष रायपुरे, संगीतराव भोंगळ, अॅड अनंतराव वानखेडे, आशिष रहाटे, नंदु कर्हाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नव्या उमेदीने कामाला लागा
जिल्ह्यात मविआची मजबूत पक्कड आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यानही मतदार मविआच्या बाजूने उभा होता. एकंदरीत वातावरण अनुकुल असतानाही महायुतीच्या भ्रष्ट नितीमुळे आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने खचून न जाता पदाधिकाऱ्यांनो, आता नव्या उमेदीने कामाला लागा, असे आवाहन राहुल बोंद्रे यांनी केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये संधीचे सोने करुन जास्तीत जास्त उमेदवार हे मविआचेचं विजयी होतील, असा विश्वास बोंद्रे यांनी व्यक्त केला.