व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Cockroach janta party : सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धडाका

Cockroach janta party : सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धडाका

cockroach-janta-party-social-media-viral-abhijeet-dipke-marathi-news : अवघ्या आठ दिवसांत कोटींचा टप्पा पार, पारंपरिक राजकारणालाही दिलं आव्हान

Mumbai : देशभरात सध्या सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाची जोरदार चर्चा सुरू असून अवघ्या काही दिवसांत या डिजिटल मोहिमेने विक्रमी लोकप्रियता मिळवली आहे. सुरुवातीला अनेकांनी या उपक्रमाकडे केवळ गंमत म्हणून पाहिले, मात्र अल्पावधीतच ही मोहीम देशभरातील तरुणांच्या चर्चेचा विषय बनली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे.

१५ मे रोजी सुरू झालेल्या या मोहिमेने सोशल मीडियावर अभूतपूर्व विक्रम नोंदवला आहे. अवघ्या आठ दिवसांत या पेजला एक कोटी १८ लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. इतक्या कमी कालावधीत एखाद्या सामाजिक किंवा राजकीय स्वरूपाच्या डिजिटल मोहिमेला मिळालेला हा विक्रमी प्रतिसाद मानला जात आहे. विशेष म्हणजे, फॉलोअर्सच्या बाबतीत देशातील प्रसिद्ध युट्यूबर आणि ब्लॉगर ध्रुव राठी यांनाही या मोहिमेने मागे टाकल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

या मोहिमेमागे छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके या मराठमोळ्या तरुणाचे नाव समोर आले आहे. अमेरिकेतील बोस्टनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाने वेबसाईट, इन्स्टाग्राम हँडल आणि एक्स अकाउंट सुरू केले. त्यानंतर काही दिवसांतच या मोहिमेने देशभरातील तरुणांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर विविध मीम्स, उपरोधिक पोस्ट आणि तरुणांच्या भावना व्यक्त करणाऱ्या संदेशांमुळे ही मोहीम वेगाने व्हायरल झाली.

Ips transfer : महाराष्ट्र पोलीस दलात सत्ताकेंद्रित मोठा फेरबदल

अभिजीत भगवानराव दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरातील वाळूज परिसरातील रहिवासी आहेत. त्यांनी पुण्यातून ब्रॉडकास्ट जर्नलिझमचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. डिजिटल कम्युनिकेशन, राजकीय संदेशरचना आणि सोशल मीडिया मोहिमांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. राजकीय नॅरेटिव्ह तयार करणे आणि सोशल मीडियाद्वारे जनमत घडवणे या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.

२०२० ते २०२३ या कालावधीत अभिजीत दीपके यांनी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान मीम्स आणि डिजिटल प्रचार मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. सोशल मीडियावर प्रभावी संदेशरचना आणि तरुणांपर्यंत पोहोचणाऱ्या मोहिमांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

Sudhir Mungatiwar : मुनगंटीवारांचा दणका अन् राज्यात ‘लिंकिंग’चा खेळ खल्लास

दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’ या मोहिमेमुळे सोशल मीडियावरील डिजिटल प्रभाव, तरुणांचा सहभाग आणि राजकीय उपरोध याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पारंपरिक राजकीय पद्धतींपेक्षा वेगळ्या शैलीत तरुणांपर्यंत पोहोचणाऱ्या या मोहिमेने अल्पावधीतच देशभरातील नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले असून आगामी काळात ही चर्चा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!