donald-trump-white-house-shooting-secret-service-action-washington-news-marathi : डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित; सिक्रेट सर्व्हिसच्या कारवाईत संशयित ठार
Washington : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी पुन्हा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉनजवळ शनिवारी संध्याकाळी झालेल्या तुफानी गोळीबारामुळे काही काळ संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्या वेळी व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. मात्र, सिक्रेट सर्व्हिसच्या तातडीच्या कारवाईमुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेत हल्लेखोराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका नागरिकाला गोळी लागून दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसजवळील 17व्या स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू परिसरात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक गोळीबार सुरू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 20 ते 30 गोळ्या झाडल्याचे मोठे आवाज ऐकू आले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. संशयित व्यक्तीने सुरक्षा तपासणी नाक्याजवळ येत आपल्या बॅकपॅकमधून शस्त्र बाहेर काढले आणि तैनात सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार सुरू केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसने तातडीने संपूर्ण परिसर सील केला. व्हाईट हाऊसमधील मीडिया प्रतिनिधींना ब्रिफिंग रूममध्ये हलवण्यात आले, तर छतांवर काउंटर स्नायपर्स तैनात करण्यात आले. काही मिनिटांतच संपूर्ण व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्स लॉकडाउन करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून संयुक्त तपास सुरू करण्यात आला आहे.
Fuel crisis : डिझेलसाठी महाराष्ट्र पेटला, इंधन टंचाईने पेरणीपूर्व मशागत ठप्प!
सिक्रेट सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या चकमकीदरम्यान एका नागरिकालाही गोळी लागली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्या नागरिकाला संशयिताने गोळी मारली की सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत तो जखमी झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
या घटनेनंतर अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी पत्रकारांच्या डिनर कार्यक्रमादरम्यानही गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा व्हाईट हाऊस परिसरात झालेल्या या हल्ल्यामुळे अमेरिकन सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Legislative Election : युवा स्वाभिमानने कसली कंबर, महायुतीकडे जागेची मागणी!
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित असल्याचे व्हाईट हाऊस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या कारवाईत सिक्रेट सर्व्हिसचा कोणताही अधिकारी जखमी झालेला नसल्याची माहितीही अधिकृतरीत्या देण्यात आली आहे. अमेरिकेतील या ताज्या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली असून पुढील काही दिवस वॉशिंग्टनमध्ये सुरक्षा अधिक कडक करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








