Congress holds review meeting for training related to the SIR campaign : काँग्रेसच्या संघटनात्मक तयारीवर विरोधकांची टीका
Khamgao राज्यभर विशेष गहन पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. निवडणूक विभागानेही या मोहिमेसाठी आवश्यक तयारी पूर्ण केल्यानंतर २० जूनपासून राज्यभर मोहिमेची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने खामगाव येथे एसआयआर प्रशिक्षण शिबिरासंदर्भात आढावा बैठक आयोजित केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
एसआयआर मोहिमेच्या अनुषंगाने बहुतांश प्रमुख राजकीय पक्षांनी यापूर्वीच आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, मतदार यादी पडताळणीचे नियोजन आणि संघटनात्मक तयारी पूर्ण केल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत मोहीम सुरू झाल्यानंतर काँग्रेसकडून प्रशिक्षण बैठक घेण्यात आल्यामुळे पक्षाची तयारी उशिरा सुरू झाल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाच्या मोहिमेच्या अंमलबजावणीदरम्यान प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने काँग्रेसच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही राजकीय विश्लेषकांनी या परिस्थितीची तुलना “वरातीमागून घोडे” या म्हणीशी करत काँग्रेसच्या संघटनात्मक तयारीवर भाष्य केले आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील अचूकता आणि पक्षीय यंत्रणेची तत्परता महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे एसआयआरसारख्या संवेदनशील मोहिमेत वेळेआधी तयारी करणे अपेक्षित असताना काँग्रेसची हालचाल उशिरा झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
Operation Lotus : विदर्भात ‘ऑपरेशन कमळ’? उद्धव ठाकरे आपल्या टीमसोबत शुक्रवारी विदर्भात
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांकडून ही बैठक कार्यकर्त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि मोहिमेच्या पुढील टप्प्यांसाठी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी विरोधकांनी या मुद्द्यावरून पक्षाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.यामुळे खामगावातील या बैठकीनंतर एसआयआर मोहिमेबाबत काँग्रेसची तयारी खरोखरच उशिरा सुरू झाली का, की हा विरोधकांचा राजकीय प्रचार आहे? असा प्रश्न आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.








